
शेतकरी चौक तरोडा नाका येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस बंदोबस्त होईल का? हे सर्व उपाय राबवणे अत्यावश्यक आहे.प्रशासन जागं होणार आहे का? की पुन्हा एखाद्या अपघाताची, एखाद्या मृत्यूची वाट पाहणार आहे?हा प्रश्न आता केवळ तरोडा नाक्याचा नाही,तो संपूर्ण नांदेडकरांचा आहे………………………………..! दि.२८ नांदेड (उपसंपादक; सतीश वागरे) —– शहराचा तरोडा नाका शेतकरी चौक हा आज केवळ एक वाहतूक चौक राहिलेला नाही, तो प्रशासनाच्या उदासीनतेचा, नियमभंगाच्या राजरोस संस्कृतीचा आणि नागरिकांच्या जीवित मूल्याच्या अवमूल्यनाचा जिवंत पुरावा बनला आहे. दररोज हजारो नागरिक या चौकातून प्रवास करतात. विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, नोकरदार, महिला, वृद्ध. मात्र या सर्वांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ज्या यंत्रणांवर आहे, त्या यंत्रणा येथे पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे.वसमत-नांदेड, मालेगाव, मेडिकल हॉस्पिटल, तरोडा नाका या सर्व मार्गांचा संगम असलेला हा चौक आज अक्षरशः अराजकतेच्या विळख्यात सापडलेला आहे. अर्ध्या रस्त्यात उभ्या राहणाऱ्या ऑटो रिक्षा, मनमानी थांबे, जोरजोरात ओरडून प्रवासी खेचण्याची असभ्य पद्धत, सतत हॉर्न वाजवून निर्माण होणारा मानसिक ताण या सर्व गोष्टींमुळे वाहतुकीचे नियम केवळ कागदावरच उरले आहेत.दुचाकीस्वारांचे जागेवरच कोसळणे, किरकोळ अपघातांचे वाढते प्रमाण, वाहनचालकांचे लक्ष विचलित होणे, हे अपघात नसून, नियोजनशून्य व्यवस्थेचे परिणाम आहेत. प्रश्न असा आहे की, हे सगळे घडत असताना वाहतूक पोलीस नेमके काय करत आहेत? भारतातील प्रशासनाची एक जुनी आणि दुर्दैवी परंपरा आहे, अपघात झाल्यावरच जागे होण्याची. तरोडा नाका शेतकरी चौकात ही हीच परंपरा सुरू असल्याचे दिसते. नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांवर ठोस कारवाई होत नसल्यामुळे त्यांची दादागिरी दिवसें-दिवस वाढत आहे. दंड, परवाना रद्द करणे, वाहन जप्ती या कारवाया केवळ कागदी घोषणांपुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. शेतकरी पुतळ्याजवळ दिवसा ढवळ्या सुरू असलेले देशी दारूचे अड्डे हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. मद्यपान करून वाहन चालवणारे चालक, भांडणे, गोंधळ हे सर्व अपघातांना आमंत्रण देणारे घटक आहेत.अपघातांची मालिकाच तरोडा नाक्यापासून पुढे तुळशीराम नगर, छत्रपती चौक परिसरात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अनेक अपघातां ची नोंद ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रशासनाच्या अपयशा चा लेखाजोखा आहे. हे अपघात वाहतूक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस अधीक्षक किंवा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास येत नाहीत, हे मान्य करणे म्हणजे त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे करणे होय.आज नागरिक विचारत आहेत, मानवी जीवनाचे मोल इतके शून्य झाले आहे का? निवडणुकीच्या वेळी आश्वासनांची रेलचेल करणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर या प्रश्नांकडे पाठ फिरवतात. रस्ते, वाहतूक, सुरक्षितता हे मूलभूत प्रश्न असताना ते केवळ उद्घाटन, बॅनर आणि फोटोपुरते मर्यादित राहतात. शेतकरी पुतळा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दररोज मानसिक तणाव सहन करावा लागतो. घराबाहेर पडताना “आज सुखरूप परत येऊ का?” हा प्रश्न त्यांच्या मनात असतो. हा प्रश्न केवळ नागरिकांचा नसून, तो प्रशासनालाही लाजवणारा आहे. उद्या येथे एखादी मोठी दुर्घटना घडली, एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेला, तर जबाबदारी कोण घेणार? वाहतूक पोलीस प्रशासन? पोलीस प्रशासन? स्थानिक स्वराज्य संस्था? की लोकप्रतिनिधी? की पुन्हा नेहमीप्रमाणे “चौकशीचे आदेश” देऊन प्रकरण संपवले जाणार?तरोडा नाका शेतकरी चौकात तातडीने प्रभावी वाहतूक नियोजन वाहतूक निरीक्षक लावतील का हा प्रश्न येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा आहे. बेकायदेशीर ऑटो स्टँड हटवणे हे येथील वाहतूक पोलीस प्रशासनात शक्य होईल का? नियम मोडणाऱ्या ऑटो चालकांवर तसेच रवी करणाऱ्या ऑटो चालकांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई वाहतूक पोलीस प्रशासनाकडून होईल का?