
दि. ३१ नांदेड ( उपसंपादक ; सतीश वागरे ) महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विशेष म्हणजे निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक जाहीर झालेली ही युती जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी, त्यात अधिकच संभ्रम निर्माण करणारी ठरली आहे. राजकारणात युती हा शब्द नवीन नाही. मात्र युतीचा अर्थ विश्वास, सातत्य आणि स्पष्टता असा असतो. इथे मात्र चित्र वेगळे दिसते. नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत याच दोन पक्षांनी युती केली आणि ती आठ दिवसांत तुटली. हा अनुभव अजून ताजा असताना पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न आज प्रत्येक मतदाराच्या मनात आहे. सत्ता जवळ आली की विचार बदलतात का? निकाल लागल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या काही नेत्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा सोबत पत्रकार परिषदेत युती असल्याची घोषणा करणे, हा प्रकार राजकीय सुसंगतते पेक्षा संधीसाधूपणाची छाप अधिक पाडणारा आहे. युती आधीच ठरलेली होती, तर ती शेवटच्या दिवशीच का जाहीर झाली? आणि जर ठरलेली नव्हती, तर आज ती कोणत्या नैतिक अधिष्ठानावर केली जात आहे? कार्यकर्ते व इच्छुकांची कोंडी या युतीचा सर्वात मोठा फटका बसला आहे, तो तळागाळातील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना. अनेक प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठी होती. युतीमुळे अचानक राजकीय गणिते बदलली आणि अनेकांची अवस्था “इकडे आड, तिकडे विहीर” अशी झाली. हा प्रश्न केवळ उमेदवारीचा नाही, तर राजकीय प्रामाणिकतेचा आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, केवळ वरच्या पातळीवरील सौदेबाजीसाठी युती होत असेल, तर ते लोकशाहीसाठी धोक्याचे संकेत आहेत. मतदार मूर्ख नाही महानगरपालिके तील मतदार आता राजकीय प्रयोगांना कंटाळले आहेत. “मत मागताना एकत्र आणि निकालानंतर वेगवेगळे” अशी भूमिका राहिली, तर जनता त्याची किंमत मोजायला तयार नाही. तर राजकारणीच त्याची किंमत मोजतील, हे लक्षात ठेवावे लागेल. युतीचा खरा अर्थ काय? आजही प्रश्न अनुत्तरितच आहेत. ही युती रणनीतिक गरज आहे का? मतांचे विभाजन टाळण्याचा आटापिटा आहे का? की केवळ वेळेपुरता राजकीय डाव? जोपर्यंत या प्रश्नांची स्पष्ट, ठाम आणि प्रामाणिक उत्तरे जनतेसमोर येत नाहीत, तोपर्यंत ही युती विश्वास निर्माण करू शकत नाही.आज तरी काँग्रेस-वंचित युती ही खुशीपेक्षा संभ्रम, समाधानापेक्षा प्रश्नचिन्हे आणि विश्वासापेक्षा साशंकताअधिक निर्माण करताना दिसत आहे. राजकारण हे गणित असू शकते, पण लोकशाही ही भावनांवर चालते. त्या भावना दुखावल्या गेल्या, तर युती कितीही मोठी असली तरी जनतेच्या न्यायालयात ती टिकत नाही. आगामी काळात ही युती तळागाळातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार यांना विश्वासात घेते की नाही? यावरच तिचे भवितव्य ठरणार आहे.