
मात्र ७३ ते ५१ टक्क्यांदरम्यान उमटलेला हा मतदानाचा कौल एक गोष्ट स्पष्टपणे सांगून जातो. मतदार जागा आहे.आता जागं राहणं राजकारणाच्या हातात आहे.
दि.१५ नांदेड ( उपसंपादक : सतीश वागरे ) –———–नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मतदानाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मतदान केंद्रांवर उमटलेली गर्दी, रांगा, गोंधळ आणि उत्सुकता पाहता ही निवडणूक केवळ उमेदवारांची किंवा पक्षांची नव्हती, तर ती मतदारांच्या अपेक्षांची आणि अस्वस्थतेची अभिव्यक्ती होती, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.या निवडणुकीत वसरणी/कौठा प्रभागात तब्बल ७३.५८ टक्के, हैदरबागमध्ये ६९.७३ टक्के, उमर कॉलनीत ६८.०४ टक्के, तर अनेक प्रभागांत ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. काही प्रभागांत मतदानाची टक्केवारी तुलनेने कमी असली, तरी एकूण चित्र पाहता शहरातील नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ही आकडेवारी केवळ संख्या नसून, ती लोकशाहीतील सहभागाची तीव्रता दर्शवणारी नोंद आहे.प्रभाग पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत अनेक मतदारांना मतदान करताना अडचणी आल्या. मतदान कसे करायचे? ईव्हीएमवर योग्य पर्याय कसा निवडायचा? प्रभागांची रचना काय आहे? हे समजावून सांगण्याची वेळ अनेक ठिकाणी प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर आली. प्रशासन, निवडणूक यंत्रणा आणि सर्वच राजकीय पक्षांकडून जनजागृती अधिक प्रभावीपणे झाली असती, तर ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली असती, अशी भावना मतदारांमध्ये दिसून आली.या निवडणुकीत , मतदारांनी पक्षांच्या नावांपेक्षा स्थानिक प्रश्न, प्रतिनिधित्व आणि भविष्यातील अपेक्षा यांचा अधिक विचार केला आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण हे मुद्दे प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात होतेच. पण मतदारांचा वाढलेला सहभाग सूचित करतो की, नागरिक आता केवळ आश्वासनांवर समाधानी नाहीत, त्यांना उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि स्थानिक निर्णयप्रक्रियेत सहभाग हवा आहे. काही प्रभागांत दिसून आलेले क्रॉस व्होटिंग हे ही त्याचेच द्योतक मानावे लागेल.महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाचा किंवा विचारधारेचा एकाधिकार स्पष्टपणे दिसत नाही. जिथे मतदानाची टक्केवारी जास्त आहे, तिथे अपेक्षाही अधिक आहेत. आणि जिथे मतदान कमी आहे, तिथे नाराजी किंवा उदासीनते चे संकेत दिसत आहेत. हा संदेश सर्व पक्षांसाठी जवळपास सारखाच आहे.नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची ही निवडणूक सांगूनजाते की, लोकशाही केवळ मतदानाच्या दिवशी संपत नाही. मतदानाची टक्केवारी ही केवळ निकालाची प्रस्तावना असते. खरा कस लागतो. तो निवडून आलेले प्रतिनिधी या आकडेवारीचा अर्थ कसा लावतात, मतदारांनी दिलेल्या संधीचे सोनं करतात की, पुन्हा पुढील निवडणुकीपर्यंत विसरतात, यावर. उद्याचा निकाल सत्ता कोणाच्या हाती जाईल हे ठरवेल.