काँग्रेस विरोधाच्या घोषणेत काँग्रेसचेच पुनरागमन: सत्तेच्या भूखेसमोर विचारधारेची हार

दि. १७ नांदेड ( उपसंपादक:सतीश वागरे ) ——-“काँग्रेसमुक्त भारत” ही घोषणा कधी काळी वैचारिक संघर्षाचे प्रतीक मानली गेली होती. पण आज तिचा अर्थ बदलला आहे. काँग्रेस संपवण्या ऐवजी काँग्रेसला सामावून घेण्याची ही रणनीती बनली आहे. भाजपने ज्या पक्षाला भ्रष्टाचार, घराणेशाही आणि अपयशाचे प्रतीक ठरवले, त्याच पक्षातील चेहरे आज कमळाच्या माळेत गुंफले जात आहेत. हा राजकीय विजय नसून वैचारिक शरणागती आहे.नगरपालिके पासून महानगरपालिके पर्यंत सत्तेचे आकडे वाढले, पण विचारांची उंची घटली. निवडणूक जिंकणारे बहुतांश चेहरे तेच आहेत, जे कालपर्यंत पंजा आणि घड्याळाचे प्रतिनिधी होते. फरक इतकाच की, आता चिन्ह बदलले आहे. पण मानसिकता, सवयी आणि सत्तेचे गणित तसेच आहे. मतदारांनी विचार बदलून मतदान केले की, केवळ चिन्ह बदलले, हा प्रश्न आज उघडपणे उभा राहिला आहे. भाजपचा सर्वात मोठा नैतिक दावा होता, परिवारवाद आणि संधी-साधूपणा विरोधातील लढा. पण आज, सत्तेच्या गणितात बसत असेल तर परिवारवादी उमेदवारही चालतात, काल पर्यंत विरोधात असलेले नेते ही चालतात, आणि ज्यांनी पक्ष वाढवला, झेंडे वाहिले, संघर्ष केला ते कार्यकर्ते मात्र बाजूला पडतात. हा पक्ष विस्तार नाही, हा पक्ष विसर्जन आहे.बिनविरोध निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांचा वाढता आकडा लोकशाही साठी धोक्याचा इशारा आहे. मतदारांच्या कसोटी शिवाय सत्ता मिळवणे हे लोकशाहीचे अपयश आहे, यश नव्हे. मतपेटी पेक्षा व्यवस्थापन महत्त्वाचे ठरू लागले की, लोकशाही सत्ताकेंद्रित होते. आणि सत्ताकेंद्रित राजकारणात विचारधारे साठी जागा राहत नाही.आज भाजपचा विजय हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे का, की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जुन्या सत्तातंत्राचा पुनर्वापर आहे, हा प्रश्न टाळता येत नाही. जर तेच चेहरे, तेच नेटवर्क आणि तेच राजकीय व्यवहार पुन्हा सत्तेत येत असतील, तर परिवर्तन कुठे आहे? ‘नवा भारत’ कुठे आहे?“काँग्रेसमुक्त भारत” ही संकल्पना आज “काँग्रेस-आत्मसात भाजप” अशी झाली आहे. ही केवळ पक्षांतराची गोष्ट नाही, तर राजकीय नैतिकतेच्या अधःपतनाची प्रक्रिया आहे. सत्ता हाच अंतिम विचार मानला की लोकशाहीचे मूल्य संपते. विचारधारेचा बळी देऊन मिळवलेली सत्ता ही क्षणिक असते, पण तिचे दुष्परिणाम दीर्घकालीन असतात.आता जबाबदारी मतदारांची आहे. त्यांनी मतदान केले ते चिन्हासाठी की विचारासाठी, हा आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. कारण चिन्ह बदलू शकतात, पक्ष बदलू शकतात, पण जर विचारही बदलत नसतील तर लोकशाही केवळ नावापुरती उरते. आणि जिथे विचार संपतात, तिथे लोकशाही नाहीशी होऊन सत्ता-शाही जन्माला येते. हे ओळखण्याची वेळ आता आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top