“शिक्षण हीच सामाजिक मुक्ती!” महाडच्या क्रांतिभूमीतून महाराष्ट्रभर पेटणार विद्रोही विचारांची मशाल

विद्रोही कवी मिर्झा शिवाजीराव पेटारे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र जनसंवाद यात्रा’चा ऐतिहासिक एल्गार

दि. ३० महाड | (विशेष प्रतिनिधी) —————- शेकडो वर्षांची गुलामगिरी ज्या चवदार तळ्याच्या काठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूठभर पाण्याने चिरडून टाकली, त्याच पवित्र क्रांतिभूमीतून आता सामाजिक परिवर्तनाचा नवा हुंकार घुमणार आहे. “शिक्षण हीच सामाजिक मुक्ती!” या मूलगामी विचाराला केवळ घोषवाक्य न ठेवता तो तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्रोही कवी मिर्झा शिवाजीराव पेटारे यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र जनसंवाद यात्रा’ सज्ज झाली आहे. ही यात्रा केवळ प्रवास नाही, तर प्रस्थापित व्यवस्थेच्या विषमते विरुद्ध उभारलेला वैचारिक संघर्ष आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवणे, आंबेडकरी विचारांची पेरणी करणे आणि संविधानाने दिलेल्या समता, न्याय व बंधुतेच्या मूल्यांचे पुनर्जागरण करणे, हा या यात्रेचा मुख्य निर्धार आहे.

१० फेब्रुवारी २०२६ रोजी महाड येथून सुरू होणारी ही वैचारिक पदयात्रा तब्बल १८० दिवस चालत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. या काळात कविता, साहित्य, संवाद आणि प्रश्नांच्या आसूडाने सत्ताधीशांच्या व विषमतेच्या मानसिकतेला आव्हान दिले जाणार आहे.विषमतेच्या तटबंदीवर शब्दांचे प्रहार विद्रोही कविता आणि धारदार साहित्याच्या माध्यमातून घराघरात परिवर्तनाची ठिणगी पेटवणे, शिक्षण संस्था उभारणीसाठी निधी संकलन करून वंचितांसाठी ज्ञानाची दारे उघडणे आणि युवक, कष्टकरी व उपेक्षित समुदायाशी थेट संवाद साधणे हे या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.

“तहानलेल्या पाखरांवर तू कसे उपकार केले…एकच ओंजळ प्यायला अन् सारे तळे चवदार केले”

या ओळींच्या साक्षीने ही यात्रा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यायाचा आवाज बुलंद करणार आहे. ही लढाई केवळ एका व्यक्तीची नाही ती संविधान, माणूसपण आणि मानवी प्रतिष्ठेच्या बाजूने उभ्या असलेल्या प्रत्येक संवेदनशील नागरिकाची आहे. आता वेळ आली आहे संघटित होण्याची, पेटून उठण्याची आणि विचारांच्या मशालीने अन्यायाचा अंधार दूर करण्याची!
संपर्क व सहभाग: ७४९८१५१००७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top