दि २२ नांदेड;(ग्रामीण प्रतिनिधी)
मुंबई येथील महाराष्ट्र कला, साहित्य संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘झिम्माड साहित्य महोत्सव -२०२५’ च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी, समीक्षक पी. विठ्ठल यांची निवड करण्यात आली आहे.

झिम्माड महोत्सवाचे यंदा आठवे वर्ष असून दि. २ व ३ ऑगस्ट, २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे निसर्गरम्य परिसरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महोत्सवाच्या संयोजक आणि संस्थेच्या अध्यक्ष प्रा. वृषाली विनायक यांनी दिली. ‘महाराष्ट्रात मराठी भाषा संवर्धनासाठी सुरू असलेल्या लढ्याला समर्पित’ असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शक सुषमा देशपांडे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आणि मराठी भाषेच्या लढ्याचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ अभ्यास प्रा. दीपक पवार (मुंबई) यांची उपस्थिती असणार आहे. याशिवाय दिलीप पांढरपट्टे, अनिल गावस, किरण येले, विनायक पवार, मंगेश सातपुते आदी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले कलावंत, साहित्यिकही उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी झालेल्या महोत्सवाचे अध्यक्षपद विलास देशपांडे, रवींद्र लाखे, प्रज्ञा दया पवार, महेश केळुसकर, श्रीकांत देशमुख, अजय कांडर यांनी भूषविले आहे.
डॉ. पी. विठ्ठल हे नव्या पिढीतील प्रतिभावंत कवी, समीक्षक, कादंबरीकार आणि अभ्यासक असून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात ते प्राध्यापक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे देखील ते सदस्य आहेत. ‘माझ्या वर्तमानाची नोंद’, ‘शून्य एक मी’, ‘सार्वकालिक सर्वत्र’ या कवितासंग्रहांसह त्यांची सुमारे एकोणवीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांचा समावेश असून हिंदी, पंजाबी, गुजराती, इंग्रजी इत्यादी भाषेत त्यांच्या कवितांचे अनुवाद झाले आहेत. त्यांना साहित्य क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
झिम्माड महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वृषाली विनायक, अरुण गवळी, जितेंद्र लाड, संध्या लगड, शालिनी आचार्य, संजय शिंदे, सुदेश मालवणकर, कविता मोरवणकर, नितीन पाटील, संदीप जालगांवकर, परशुराम घाणेकर, सोनाली अहिरे आदी परिश्रम घेत आहेत.