दि.१६ नांदेड (उपसंपादक सतीश वागरे)
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि काँग्रेस या दोन भिन्न विचारांच्या पक्षांनी केलेल्या युतीमुळे जिल्हा पातळीवरील राजकीय वातावरणात नवीन हलचल निर्माण झाली आहे. १३ नगरपालिका/नगरपरिषदांमध्ये 50-50 जागावाटपाच्या तत्त्वावर युती राबविली जात असली, तरी ती सर्वत्र एकसमान नाही. त्यामुळे या युतीचे परिणाम जिल्हानुसार वेगवेगळे दिसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
ज्या जिल्ह्यांत वंबआ चे स्थानिक नेतृत्व सक्रिय आणि प्रभावी आहे, त्या ठिकाणी काँग्रेसला तातडीने राजकीय लाभ मिळू शकतो. तर काही ठिकाणी या युतीकडे संशयाने पाहणारा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आणि वंबआ चा तळागाळातील कॅडर यांच्यात मतांतरणाची भीतीही व्यक्त होत आहे. भूतकाळात वंबआ कडून अनेकदा “काँग्रेस हे जळतं घर आहे” अशी तीव्र टीका झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर आता झालेली युती मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण करणार हे निश्चित आहे. काही मतदारांमध्ये अविश्वास, युतीला तात्पुरती राजकीय सोय मानणारा वर्ग, विरोधी पक्षांत या वक्तव्यांवरून होणारे राजकीय टीकास्त्र ही सर्व समीकरणं काही ठिकाणी वंबआ–काँग्रेसच्या एकत्रित मतांना मारक ठरू शकतात. जिल्ह्यानुसार दोन्ही पक्षांचे स्थानिक सामाजिक समीकरण, जातीय रचना आणि नेतृत्वातील समन्वय वेगळा असल्याने, काही ठिकाणी युतीला वास्तविक लाभ, काही ठिकाणी अंतर्गत नाराजी तर काही ठिकाणी मतांच्या विभागणीचे धोके अशा मिश्र स्वरूपातील निष्पन्न दिसण्याची चिन्हे सध्या राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दोन्ही पक्षांतील परस्पर विश्वासाबाबत प्रश्नचिन्ह कायमच! दिसून येत आहे.
काँग्रेसला वंबआ ची सातत्याने झालेली टीका आठवते; तर वंबआ ला काँग्रेसचा भूतकाळातील सत्तानिवडीतील व्यवहारवाद अनुभव येतो. त्यामध्ये स्थानिक पातळीवरील गटबाजी, उमेदवारांच्या नावे विवाद, कॅडर पातळीवरील नाराजी हे सर्व घटक दोन्ही पक्षांच्या विश्वासार्हतेला आव्हान देऊ शकतात. महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग मोकळा की तात्पुरता मेळ? ही युती दीर्घकालीन रणनीती आहे की, केवळ सध्या भाजपविरोधात संयुक्त समीकरण म्हणून केलेली राजकीय सोय? हे खरेतर मतदारांनाच ठरवू द्यावे लागेल. अनेक राजकीय विश्लेषकांनुसार
“ही युती जर स्थानिक पातळीवर कार्यक्षम ठरली, संघर्ष टाळला आणि मतांची एकसंधी निर्माण केली, तर महानगरपालिकांसाठी मार्ग मोकळा होऊ शकतो; अन्यथा ही फक्त एक तात्पुरती राजकीय तडजोड ठरेल.