
दि. ६ नांदेड (प्रतिनिधी नांदेड शहर ) ____________________भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड शहरात सम्राट अशोका भीम जयंती मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेली पणती ज्योत रॅली ही केवळ एक श्रद्धांजली नव्हे, तर बाबासाहेबांच्या विचारांची जिवंत मशालच ठरली. या रॅलीतून सामाजिक समतेचा, मानवतेचा आणि न्यायाचा संदेश पुन्हा एकदा जनतेच्या मनात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.सम्राट अशोक नगर येथून सुरू झालेली ही ज्योत यात्रा थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत पोहोचली. हजारो पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या रस्त्यांवरून चालणारी ही रॅली बाबासाहेबांच्या तेजस्वी विचारांचे प्रतीक ठरली. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते मयूर भाऊ कोकरे आणि युवा नेते प्रदीप भाऊ भोकरे यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. त्यांच्या नेतृत्वामुळे या उपक्रमाला अधिक सामाजिक बळ मिळाले.या पणती ज्योत रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी, महिला उपासिका व उपासकांचा सहभाग ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. महिलांची मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती ही बाबासाहेबांच्या स्त्रीमुक्तीच्या विचारांना मिळालेली खरी पावती आहे. शिक्षण, स्वाभिमान, समता आणि बंधुतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या रॅलीतून घडले.महापरिनिर्वाण दिन हा केवळ शोकाचा दिवस नसून, बाबासाहेबांच्या विचारांना नव्याने उजाळा देण्याचा, त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, दुर्बलांना बळ देणे आणि संविधानातील मूल्यांचे रक्षण करणे हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल हा संदेश या रॅलीतून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.आजच्या अस्वस्थ सामाजिक वातावरणात अशा प्रकारचे उपक्रम समाजाला सकारात्मक दिशा देणारे ठरतात. बाबासाहेबांचे विचार हे काळावर मात करणारे आहेत. त्यांची शिकवण पिढ्यान् पिढ्या उजळून टाकणारी आहे. पणती ज्योत रॅलीच्या माध्यमातून नांदेडमध्ये त्या विचारांची मशाल अधिक तेजस्वीपणे प्रज्वलित झाली आहे, यात शंका नाही.ही केवळ एक रॅली नव्हती, तर स्वाभिमान, संघर्ष आणि संविधानाच्या मूल्यांचे चालते-बोलते दर्शन होते. पणती ज्योत रॅली यशस्वी करण्यासाठी स्वप्निल उकंडे,पप्पू बुक्तरे, बलराज सावंत, सौरभ कांबळे, विशाल ढोले, करण बुक्तरे आदींचे परिश्रम लाभले होते.