दि. ४ नांदेड (प्रतिनिधी)वसरणी परिसरात आज दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेत रोहित मिठुलाल मंडले (वय : 23 वर्षे) या तरुणाचा 36 केव्ही विद्युत प्रवाहाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या आकस्मिक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रोहित यांचा मागील वर्षीच विवाह झाला होता, तर त्यांची पत्नी सध्या गरोदर असल्याची माहिती सासरे चंदन यादव यांनी दिली. विशेष म्हणजे यापूर्वीही एका अपघातात रोहित यांचे मोठे बंधू यांचा मृत्यू झाला होता. आता या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे.घरात वृद्ध आई-वडील,गरोदर पत्नी, असून सध्या कुटुंबाकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे मंडले कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.मृत्यू पावलेले रोहित मंडले हे जुना नांदेड होळी परिसरातील बुरुड गल्ली, नावघाट येथील रहिवासी होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते शेतमजुरीच्या कामासाठी वसरणी परिसरात गेले होते, मात्र नियतीने त्यांच्यावर तेथूनच घाला घातला. या घटनेनंतर शासनाने तात्काळ आर्थिक मदत, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी तसेच योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कुटुंबीय, नातेवाईक व समाजबांधवांकडून जोरदार करण्यात येत आहे.