मुलांच्या भविष्याकरिता शिक्षण महत्त्वाचे असले तरी मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाल्याने पुढील काळात इंग्रजी माध्यम शाळांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दि.२१ नांदेड ( उपसंपादक;सतीश वागरे)
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अक्षरज्ञान पब्लिक स्कूल, वाडी शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर गुन्ह्यात आरोपी शिक्षकाला अटक करून आज दुपारी ३ ते ४ वाजता नांदेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलेला आणि बी.एड. प्रशिक्षण पूर्ण केलेला हा शिक्षक अशा घृणास्पद कृत्यात सामील असल्याची बाब समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एक प्रशिक्षित, शिक्षित आणि विद्यार्थ्यांना संस्कार देणारा शिक्षक असे कृत्य करेल, यावर पालक आणि समाजामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे पोलिसांनी आरोपी शिक्षका विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act, 2012) तसेच संबंधित भारतीय दंड विधानांतर्गत कठोर गुन्हे नोंदवले आहेत.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारासंदर्भात पोक्सो कायदा अत्यंत कठोर शिक्षा प्रदान करतो. त्यामुळे या प्रकरणाची तपास यंत्रणा जलदगतीने कार्यरत आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यात तसेच देशात विविध ठिकाणी इंग्रजी माध्यम (कॉन्व्हेंट) शाळांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
अक्षरज्ञानसह अनेक खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये लहान मुलींच्या प्रवेशामुळे पालकांचा विश्वास जणू ढळत चालल्याचे चित्र दिसत आहे. “इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुली खरंच सुरक्षित आहेत का?” हा प्रश्न पालकांना छळत आहे.
नांदेड शहरालगत असलेल्या या शाळेत अशी घटना घडल्याने तेथील शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक, आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या जबाबदारीबाबतही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. शाळांमध्ये सुरक्षा उपाय, CCTV मॉनिटरिंग, महिला कर्मचारी, तक्रार निवारण समिती, विद्यार्थ्यांसोबत समुपदेशन या बाबत आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याकडे चौकशी यंत्रणा लक्ष केंद्रित करत आहे.
या घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “मुलींच्या सुरक्षे बद्दल खात्री नसल्यास त्यांना इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षण देणे योग्य ठरेल का?” असा सवाल पालक करताना दिसत आहेत.