दि. ५ नांदेड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजीनगर व फुले मार्केट परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बॅनरची धारदार शस्त्राने तोडफोड केल्याच्या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष बॅनर फाडणाऱ्या आरोपींवर फक्त नोटीस देऊन कारवाई करण्यात आली, तर उलट शांतता राखण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

२२ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राचा वापर करून बॅनर फाडल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे. तरीही संबंधित आरोपींवर शस्त्र कायद्यानुसार (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात न आल्याचे गंभीर आरोप करण्यात येत आहेत. शहरातील शांतता भंग करणाऱ्या या प्रकारावर कठोर भूमिका घेण्याऐवजी केवळ नोटीस देऊन प्रकरण दाबले गेल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.दरम्यान, या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांच्यावर बॅनर परवानगी नसल्याच्या कारणावरून कलम ३२४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासन दुहेरी भूमिका घेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करावी व मुख्य सूत्रधाराला अटक करावी, तसेच इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांच्यावरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष यांनी पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.”आज आम्ही बॅनर फाडल्यावर शांततेचे आवाहन केले, उद्या दुसरा कोणी वेगळ्या पक्षाचा बॅनर फाडून समाजात तेढ निर्माण करेल. असा पायंडा पडू देऊ नये,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
