
(सतीश वागरे ) भारतीय न्युज मीडिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण या वेळी देशात नाही तर थेट जगाच्या पातळीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलाखतीदरम्यान. संपूर्ण जगाला अपेक्षा असताना की युद्ध, शांतता, जागतिक अर्थकारण, भारत-रशिया संबंध यांसारख्या गंभीर विषयांवर प्रश्न विचारले जातील, तेव्हा मात्र विचारले गेले अगदीच फोल व असंबंधित प्रश्न.“तुम्ही आमच्या पंतप्रधानांसारखे hardworking आहात का?”, “तुम्ही कधी थकत नाही का?”, “आतापर्यंतच्या पंतप्रधानांना तुम्ही किती रेटिंग द्याल?” अशा प्रश्नांमुळे प्रश्न विचारणाऱ्यांपेक्षा समोर बसलेले राष्ट्राध्यक्षच अधिक परिपक्व वाटले. अखेर पुतीन यांनीच मुत्सद्देगिरीने सांगितले की, हे प्रश्न decent नाहीत, आणि अशा गोष्टींचे मूल्यांकन नागरिकच करतात.हा प्रसंग केवळ एका मुलाखतीपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय पत्रकारितेच्या अधोगतीचे प्रतीक बनत चालला आहे. ज्या देशात उपासमार, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न पेटलेले आहेत, त्या देशातील मीडिया मात्र नेत्यांची “डेली डाएट”, “वर्किंग स्टाइल” आणि “रेटिंग कल्चर”मध्ये अडकलेली दिसते.आजही प्रश्न अनुत्तरितच आहेत, देशातील गरिबी संपली आहे का? तरुणांना रोजगार मिळतोय का? शेतकरी सुरक्षित आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, सध्याचे पंतप्रधान शेवटचे केव्हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र पत्रकार परिषदेला सामोरे गेले?लोकशाहीत पत्रकारिता ही सत्तेची पाठराखण करणारी नव्हे, तर सत्तेला प्रश्न विचारणारी असते. पण दुर्दैवाने आजचा मोठा मीडिया वर्ग हा प्रश्न विचारण्याऐवजी प्रश्न झाकण्याचे, आणि चमचागिरी करण्याचे काम अधिक करतो आहे. या पार्श्वभूमीवर हेच म्हणावे लागेल की, भारतीय न्युज मीडिया केवळ घसरलेली नाही, तर ती विश्वासार्हतेच्या तळालाच जाऊन पोहोचली आहे.