काळ्या आईच्या कुशीत ‘पांढरं विष’; अफू पेरण्याचा अंदाज, आता कायद्याचा फेरा!

जिल्ह्यातील सिरळी परिसरात अफूच्या शेतीवर पडलेला छापा ही केवळ एक पोलीस कारवाई नसून, आपल्या समाजाच्या नैतिक अधःपतनाचा एक गंभीर इशारा आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलणाऱ्या या प्रवृत्तीचा वेध..!

दि. १८ हिंगोली (विशेष प्रतिनिधी): ज्या मातीतून सुवर्ण कणांची अपेक्षा असते, ज्या मातीला आपण ‘काळी आई’ म्हणून पुजतो, त्याच मातीतून आज तरुण पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं ‘पांढरं विष’ बाहेर यावं, यासारखं दुसरं दुर्दैव नाही. हिंगोली जिल्ह्यातील सिरळी शिवारात समोर आलेला अफूच्या शेतीचा प्रकार हा केवळ कायद्याचा भंग नसून, तो समाजाच्या काळजावर झालेला वार आहे. ‘उडता पंजाब’ च्या चर्चा आपण आतापर्यंत पडद्यावर पाहिल्या होत्या, पण हिंगोलीच्या शिवारात जेव्हा अफूची फुलं डोलू लागतात, तेव्हा समजून जावे की ही शांतता भविष्यातील एका मोठ्या वादळाची नांदी आहे. ​शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो, पण जेव्हा एखादा शेतकरी केवळ अधिक पैशांच्या हव्यासापोटी लसणाच्या पिकात लपवून अफूसारख्या नशा खोरीची लागवड करतो, तेव्हा तो ‘पोशिंदा’ उरतो का? हा प्रश्न आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे.

४२ वर्षांचा प्रताप सुरेश नलगे हा शेतकरी जेव्हा आपल्या शेतात १ क्विंटल ७७ किलोहून अधिक अफू पिकवतो, तेव्हा त्याला हे माहित नसते का की, हेच विष उद्या कोणाच्या तरी तरुण मुलाचा बळी घेणार आहे? ही मानसिकता केवळ गुन्हेगारी स्वरूपाची नाही, तर ती सामाजिक द्रोह करणारी आहे. ​आजचा तरुण आधीच बेरोजगारी आणि नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. अशा परिस्थितीत गाव शिवारात सहज उपलब्ध होणारी ही नशा म्हणजे जळत्या आगीत तेल ओतण्यासारखे आहे. जे हात उद्या देशाचे भविष्य घडवणार आहेत, त्या हातांमध्ये नशेचे इंजेक्शन किंवा अफूचे बोंड देणे, हे पाप नाही का? पैशांच्या लालसेपोटी आपल्याच समाजाच्या लेकरांना मृत्यूच्या दारात ढकलणारा हा ‘शेतकरी’ समाजासाठी आदर्श असूच शकत नाही. ​एलसीबी आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई करून कौतुकास्पद काम केले आहे, यात शंका नाही. मात्र, एका सिरळीमध्ये असा प्रकार घडत असेल, तर जिल्ह्याच्या इतर दुर्गम भागात काय चालले असेल? हा प्रश्न उपस्थित होतो. पोलिसांनी केवळ गुन्हे दाखल करून थांबू नये, तर यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का? या अफूची विक्री कुठे होणार होती? याचे पाळेमुळे खोदून काढणे गरजेचे आहे. यंत्रणेने ‘खडबडून’ जागे होण्याची हीच वेळ आहे. केवळ एका छाप्यावर समाधान न मानता, ‘नशामुक्त हिंगोली’साठी एक मोठी मोहीम राबवणे ही काळाची गरज आहे. ​

समाजानेही आता तटस्थ राहून चालणार नाही. आपल्या शेजारी, आपल्या शिवारात काय पिकतंय आणि कोण काय करतोय, याकडे डोळसपणे पाहण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यां विषयी असलेली आपली आपुलकी आणि विश्वास अशा विकृत प्रवृत्तींमुळे धोक्यात येत आहे. त्यामुळे अशा ‘काळ्या’ कृत्यांचा वेळीच नायनाट करणे, हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. मातीशी गद्दारी करून आणि तरुण पिढीचे आयुष्य पणाला लावून मिळवलेला पैसा हा शाप असतो. हिंगोलीत सापडलेला अफूचा साठा हा केवळ मुद्देमाल नाही, तर तो आपल्या सामाजिक विघटनाचा पुरावा आहे. आता पोलीस आणि समाज या दोघांनीही एकत्र येऊन या ‘विषाची वेल’ मुळापासून उपटून टाकायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top