मराठवाड्याची शान: नांदेड विद्यापीठाची २६ वर्षांनंतर सुवर्णकीर्ती!चेन्नईत झळकावला डंका; डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्या नेतृत्वात रचला इतिहास

या ऐतिहासिक कामगिरी नंतर आता हाच संघ आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, डॉ. राजपालसिंह चिखलीकर आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नांदेड, दि.१५ मार्च : (ग्रामीण प्रतिनिधी) .
चेन्नईच्या भूमीवर जेव्हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने पाऊल ठेवले, तेव्हा त्यांच्यासमोर केवळ स्पर्धा नव्हती, तर २६ वर्षांचा इतिहास बदलण्याचे आव्हान होते. यापूर्वी विद्यापीठाने दोनदा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कारांना गवसणी घातली होती, परंतु सहभागी झालेल्या सर्वच्या सर्व कलाप्रकारांत एकाच वेळी यश मिळवण्याची ही २६ वर्षांनंतरची पहिलीच अभूतपूर्व घटना ठरली आहे. ७ पैकी ७ ही प्रकारांत बाजी मारत विद्यापीठाने ‘शतप्रतिशत’ यशाचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
​मराठवाड्याच्या मातीतील कलाकारांनी १४२ विद्यापीठां च्या अटीतटीच्या लढतीत आपला वेगळा ठसा उमटवला. २६ वर्षांपूर्वी ज्या लोकनृत्याने सुवर्णपदक मिळवून दिले होते, त्याच परंपरेला आजच्या पिढीने पुन्हा एकदा सुवर्ण झळाळी दिली. संदेश हटकर यांच्या मार्गदर्शनाखालील ‘दंडार’ नृत्याने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. तर दिलीप डोम्बे (स्किट व मूक अभिनय), डॉ. शिवराज शिंदे (वाद्यवृंद) आणि संकेत गाडेकर यांच्या तांत्रिक कौशल्यामुळे प्रत्येक सादरीकरण ‘परफेक्ट’ ठरले. ​हा विजय केवळ रंगमंचावरील कलाकारांचा नाही, तर पडद्यामागे अहोरात्र झटणाऱ्या ‘टीम’चा आहे.

संघ व्यवस्थापक डॉ. संदीप काळे यांनी संघाचे शिस्तबद्ध नियोजन केले, तर सिद्धार्थ नागठाणकर यांनी आपल्या कल्पक रंगभूषा आणि नेपथ्यातून सादरीकरणात जिवंतपणा आणला. विशेष म्हणजे, कार्यालयीन लिपिक संभा कांबळे यांनी घेतलेले कष्ट आणि प्रा. डॉ. व्यवहारे यांच्यासह विद्यार्थी विकास मंडळाच्या सदस्यांनी कठीण परिस्थितीत दिलेली साथ या यशाचा पाया ठरली तसेच​ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन आणि कुलसचिव प्रो. डी. डी. पवार यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे शक्य झाले असे हीं मत डॉ. चिखलीकर यांनी व्यक्त केले. विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अत्यंत कमी वेळात नियोजनाची सूत्रे हलवून विखुरलेल्या शक्तीला एकवटले आणि संघात विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला. या ऐतिहासिक विजयामुळे विद्यापीठाचा संघ आता ‘आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवा’साठी पात्र ठरला आहे. २६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मिळालेले हे ‘सर्वसमावेशक’ यश मराठवाड्याच्या कला विश्वातील एका नव्या पर्वाची नांदी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top