ढिसाळ बस सेवेतून माणुसकीचा बळी; प्रवाशांमध्ये संतापएस.टी. महामंडळाने आता तरी ठरवावे, ही सेवा जनतेसाठी आहे की,जनतेवर दडपशाही करण्यासाठी? हा प्रश्न जनसामान्यातून सातत्याने विचारला जात आहे
दि.२७ नांदेड (प्रतिनिधी: राष्ट्रापाल सोनकांबळे) नरसी-मुखेड या ग्रामीण मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसमध्ये एका वृद्ध प्रवाशाला कंडक्टर कडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यामुळे एस.टी. प्रशासनाचा ढिसाळ व असंवेदनशील कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध प्रवासी वयस्क व अशक्त असून, तिकीट व बसमधील गोंधळाच्या कारणावरून कंडक्टरने अरेरावी करत त्यांना शिवीगाळ केली आणि नंतर मारहाण केली.

सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेला कर्मचारीच जर वृद्धांवर हात उगारत असेल, तर सामान्य प्रवाशांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा सवाल उपस्थित होत आहे.एस.टी. कर्मचारी वृद्ध, अपंग व महिलांना साथ देतात की छळ करतात? राज्य परिवहन महामंडळ वारंवार “एस.टी. ही जनतेची जीवनवाहिनी आहे” असे सांगते. मात्र अशा घटनांमुळे प्रश्न निर्माण होतो की, एस.टी. कर्मचारी वृद्ध, अपंग आणि महिलांना आधार देण्यासाठी आहेत की, त्यांना अपमानित करण्यासाठी? अपंग, वयोवृद्ध व दुर्बल प्रवाशांसाठी असलेली सहानुभूती आणि संवेदनशीलतेची प्रशिक्षण व्यवस्था केवळ कागदावरच आहे का? कंडक्टर आणि चालकांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नेमकी कुठे अपयशी ठरते? ग्रामीण प्रवासी कायम दुर्लक्षित,ग्रामीण व मागास भागातील प्रवासी एस.टी.वर पूर्णपणे अवलंबून असतात. अशा भागांत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यां कडून जर माणुसकीचीच वागणूक मिळत नसेल, तर एस.टी. महामंडळाचा सामाजिक उद्देश काय, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. कारवाई होणार की नेहमीप्रमाणे मौन? ह्यावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या लक्ष लागले आहे. या प्रकरणात संबंधित कंडक्टरवर तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाई करावी, तसेच पीडित वृद्धास न्याय मिळावा, अशी मागणी प्रवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. मात्र आतापर्यंत अशा अनेक घटनां प्रमाणे याही प्रकरणात चौकशीच्या नावाखाली वेळ काढूपणा होणार की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. कार्यवाही होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.