
स्पा प्रकरणाच्या पुढील तपासाकडे आता संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले असून, व्यवस्थापक पंकज याच्याविरोधातील चौकशी अधिक वेगाने सुरू राहण्याची शक्यता आहे.
दि. ५ नांदेड | प्रतिनिधी शहरात चर्चेत असलेल्या स्पा सेंटर प्रकरणात शिवसेना पदाधिकारी अमोदसिंग साबळे यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, पिटा कायद्यातील गुन्हा क्र. ४४५/२०२५ प्रकरणात त्यांना जामिनपूर्व संरक्षण मंजूर करण्यात आले आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. न्यायालयाने तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या संपूर्ण कागदपत्रांचा आणि वाचवण्यात आलेल्या मुलींच्या जबाबांचा सखोल अभ्यास केला. त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट निरीक्षण नोंदवले की, कोणत्याही मुलीच्या जबाबामध्ये अमोदसिंग साबळे यांच्यावर थेट स्वरूपाचा कोणताही आरोप करण्यात आलेला नाही. सर्व आरोप हे मुख्यत्वे स्पा सेंटरचा व्यवस्थापक पंकज याच्यावर केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच, मुलींच्या जबाबातून जबरदस्ती, दबाव किंवा सक्तीचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. तपासात साबळे हे केवळ संबंधित जागा भाड्याने देणारे असल्याचे पुढे आले असून, स्पा सेंटरच्या दैनंदिन कामकाजाशी त्यांचा थेट संबंध आढळून आलेला नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने अमोदसिंग साबळे यांना जामिनपूर्व संरक्षण मंजूर केल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. दरम्यान, या निकालामुळे साबळे समर्थकांमध्ये समाधानाची भावना असून, विरोधकांकडून मात्र प्रकरणावर सतत लक्ष ठेवले जात आहे.