दि. ४. दिल्ली :
पाकिस्तानमध्ये आज सकाळी मोठा अपघात घडला आहे. राजधानी इस्लामाबाद येथील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीच्या तळमजल्यात असलेल्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला असून, चार जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसी सिस्टीमची दुरुस्ती सुरू असताना हा स्फोट झाला. तंत्रज्ञ गॅस प्लांटवर काम करत असताना सिलेंडर फुटल्याने जोरदार आवाज झाला आणि सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत कंप जाणवला. स्फोटानंतर कॅन्टीनमधील फर्निचर उडाले, बार असोसिएशनच्या रिसेप्शन रूमच्या काच फुटल्या आणि कोर्टरूम क्रमांक 6 ला देखील मोठे नुकसान झाले.
स्फोटानंतर घबराट आणि आरडाओरड सुरू झाली, कर्मचारी व उपस्थित लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर पळू लागले. इमारत तत्काळ रिकामी करण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणा आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
सध्या जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासात गॅस गळतीची शक्यता वर्तवली जात आहे.