दि.१६ डिसें (परभणी प्रतिनिधी;सचिन खंडागळे)
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबा उर्फ विजय वाकोडे यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यू समया पर्यंत त्यांनी अविरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. १० डिसेंबर पासून ते आज सोमनाथच्या अत्यंयात्रेपर्यंत अविरत कष्टत होते .त्यांनाही परभणी पोलिसांनी उद्रेकी आरोपींच्या यादीत टाकले होते.
परभणीतील आंबेडकरी जनतेला पोलिसांच्या कोंम्बिंग ऑपरेशननंतर आश्वस्त करत, धीर देत, शांततामय मार्गाने आंदोलनासाठी प्रोत्साहित करणारे, कमालीचे धाडसी नेते विजय वाकोडे अचानक निघून जाणे ही आंबेडकर चळवळीची भयंकर मोठी हानी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात कोणत्याही समाज घटकावर अत्याचार झाला तर हक्काचे न्याय दालन म्हणजे विजय वाकोडे हेच होते. मुस्लिम समाजाला लक्ष्य करुन एटीएसने केलेल्या कारवाई असो की, एनआरसी सिएए आंदोलनात आंदोलकांवर केलेली अमानुष कारवाई असो किंवा सध्या सुरु असलेले संविधान अवमानना आणि कोंबींग ॲापरेशनच्या आड असंख्य संविधानवादी यांच्यावर होत असलेल्या अन्याय असो किंवा नुकतेच पोलीस कोठडीत शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या व या विरोधात आजचा बंद धरणा आंदोलन आणि अत्यंत दुःखाच्या सावट व रोष असलेल्या वातावरणात झालेले अंतिम संस्कार.
या सर्व लढाईंचे सुत्र व नियंत्रण विजय वाकोडे हेच करत होते. लढाई सुरु आहे पण असंख्य सैनिकांचा सेनापती गेला ह्याचे दुःख परभणी मध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये पसरले आहे. नुसते आंबेडकरी समाज नाही तर ओबीसी व मुस्लिम समाजाचे सुद्धा दणकट नेतृत्व हरवले.

आज परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंतिम यात्रेमध्ये एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर हे आले असता बाबा उर्फ विजय वाकोडे हे सुद्धा सोबत होते परंतु अनेक दिवसांच्या धावपळी व परभणी येथील संविधान शिल्पाच्या विटंबनीच्या विरोधात तरुणाई सोबत तरुण बनवून त्यांच्या खांद्याला खांदा लावून संविधानिक पद्धतीने आंदोलनाला एक ताकत रसद पुरवली. महाराष्ट्रातील आंबेडकरी विचाराची अनेक सामाजिक संघटनांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत शेवटचा जय भीम असा सोशल मीडिया वर पोस्ट फिरत आहेत.
