नांदेडच्या रस्त्यांवर यम दूत धावतायत? बेफाम वेग आणि नियमांची पायमल्ली, अधिकारी कुणाच्या मृत्यूची वाट पाहत आहेत? तुमचं मूल त्या बसमध्ये असतं तर? जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना संतप्त पालकांचा थेट सवाल!

नांदेड, दि. २४ मार्च, (उपसंपादक : सतीश वागरे ) आज आसना पुलाजवळ ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलची बस अचानक पलटी झाल्याची गंभीर घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी ही घटना सर्वांच्या काळजाची ठरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अत्यंत गंभीर असतानाही, शाळा प्रशासना कडून वाहनांची नियमित तपासणी व योग्य देखभाल होत नसल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे. नागरिकांनी प्रशासना कडे अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तात्काळ आणि ठोस उपाय योजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी आणि जबाबदाऱ्यांची काटेकोर पूर्तता होणे अत्यावश्यक आहे. या अपघाता नंतर समाज माध्यमांवर बसचा नंबर फलक काढतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सदर बसचा गाडी क्रमांक एमएच ०४ जीपी ३६९९ असून, बसवर ‘जय श्रीकृष्णा’ असे लिहिलेले आहे. तसेच बसवर मोबाइल क्रमांक ९४२०२०१०३२ व ७०३०२०८०५२ असे नमूद केलेले आहेत. शाळेची बस ही केवळ खाजगी मालमत्ता नसून, ती विद्यार्थ्यांच्या जीवाशी निगडित सेवा आहे. त्यामुळे तिच्यावर विविध कायदे व नियम लागू होतात. कोणत्याही शाळेने बस रस्त्यावर चालविण्या साठी क्षेत्रीय परिवहन कार्यालया कडून तंदुरुस्ती प्रमाणपत्र, वाहन नोंदणी, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र आणि विशेष शाळा बस परवाना घेणे अनिवार्य आहे. हे सर्व वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत बंधनकारक आहे. याशिवाय, संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिका (जसे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) तसेच महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यां कडून शाळेची मान्यता, वाहतूक व्यवस्थेची पडताळणी आणि सुरक्षा नियमांचे पालन यांची तपासणी केली जाते. सर्वोच्च न्यायालयानेही शाळा बस साठी कडक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. बसची नियमित तपासणी क्षेत्रीय परिवहन कार्यालय, शाळा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांकडून केली जाणे आवश्यक आहे. प्रत्येक शाळा बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्र, जीपीएस प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, गती नियंत्रक, आपत्कालीन बाह्यवाहिनी, सुरक्षित खिडक्या आणि ‘शाळा बस’ अशी स्पष्ट ओळख असणे बंधनकारक आहे. तसेच लहान विद्यार्थ्यांसाठी महिला सहाय्यिकेची उपस्थिती आवश्यक मानली जाते. बस चालका कडे वैध परवाना, पुरेसा अनुभव, स्वच्छ गुन्हेगारी नोंद आणि नियमित आरोग्य तपासणी असणे आवश्यक आहे. या सर्व नियमांचा उद्देश एकच आहे, विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करणे. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते आणि अपघात झाल्यानंतरच जाग येते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे केवळ परवानग्या घेणे पुरेसे नसून, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे ही शाळा प्रशासनाची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. नांदेड मध्ये शाळा बस असो, मोठा टेम्पो असो, छोटा हत्ती असो किंवा मोठा टेम्पो ट्रॅव्हलर असो, ही वाहने अशा आडमुठेपणाने शहरातील रोड वर चालविली जातात की, चालकांना माणसाची, वृद्धांची, लहान मुलांची अजिबात पर्वा नसल्याचे दिसून येते. हे सर्व चालक बेफाम वेगाने वाहने चालवतात, धोकादायक कट करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येतो. शाळा मालकां पासून ते ग्रामीण भागातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिकां अंतर्गत येणाऱ्या सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळां मधील बस चालक या सर्वांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्याची अनेक उदाहरणे आहेत.

या सर्वांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचे काम जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, क्षेत्रीय परिवहन कार्यालयाचे पोलीस अध्यक्ष, पोलीस निरीक्षक यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. परंतु तसे न होता, अधिकाऱ्यांचाच या वाहन चालकांना ‘अभय’ असल्याचा भास होतो. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मानवी जीवनाची किंमत वेगळी असते, हे प्रशासनातील मुख्य अधिकाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. जर या बसमध्ये स्वतःचे मूल असेल आणि अशी घटना घडली, तर प्रशासकीय अधिकारी कायदा व सुव्यवस्थे नुसार काय कारवाई करतील, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ‘इतरांच्या घरात दुःख द्याल तर स्वतःच्या घरी येईल’‘इतरांच्या घरात दुःख द्याल तर तुमच्या घरात दुःख येईल,’ असे कर्म आहे. हे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. जे चालक बेफाम वाहन चालवून गाडीतील आणि रस्त्यावरील नागरिकांचा जीव धोक्यात घालतात, त्यांच्यावर काय उपाय केले जाणार आहेत, याचे उत्तर नागरिकांना हवे आहे. ही फक्त एका शाळेची बसची समस्या नसून, संपूर्ण शहरातील शालेय वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आज ही बस पलटी झाली, उद्या कोणाचे प्राण जाऊ शकतात. ही वेळ आल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा, आधीच कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शाळा बस सुरक्षेचा प्रश्न हा आता केवळ शाळा प्रशासनाच्या मर्यादे पलीकडे जाऊन, प्रशासनाच्या जबाबदारीचा ठरलेला आहे. वाहन तपासणी पासून ते चालकांच्या पात्रते पर्यंत सर्व स्तरांवर काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. अन्यथा अशा निष्काळजीपणा मुळे भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता वेळ गेली, तर मोठे संकट ओढवेल. त्यापेक्षा प्रशासन, शाळा व्यवस्थापन व पालक यांनी एकत्र येऊन शाळा बस सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळणे, ही काळाची गरज आहे.