नांदेड दि. १५ ( जिल्हा प्रतिनिधी)-
परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीशिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथे झालेल्या लाठी हल्यात आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी (35) या युवकाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्या संदर्भाने रिपब्लिकन सेनेच्यावतीने 16 डिसेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

रिपब्लिकन सेनेने जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनानुसार 10 डिसेंबर रोजी परभणी येथे आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी या आंदोलकाला मारहाण झाली. सोमनाथ सुर्यवंशी हा विधी शाखेचा विद्यार्थी आहे. पोलीसांच्या थर्ड डिग्री मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. त्या ठिकाणी महिला आंदोलकांचे डोके फुटले आहेत. महिलांच्या हातापायाला फक्चर झाले आहे. परभणी पोलीसांच्या पार्श्वमानसिकतेच्या विरुध्द उद्या दि. 16 डिसेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंद मध्ये व्यापारी, शैक्षणिक संस्था यांनी बंद ठेवून सहकार्य करावे. विद्यार्थ्यांची परिक्षा, रुग्णालय आणि औषधी दुकाने यांना बंद मधून वगळ्यात आले आहे.

परभणी येथे दलितवस्तीमध्ये गस्त घालणार्या सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर ऍट्रॉसिटी आणि बीएनएस कायद्यातील कलम 106 प्रमाणे गुन्हा नोंदवावा. परभणीचे पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, एलसीबीचे पोलीस निरिक्षक आणि संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना कायमस्वरुपी निलंबित करावे. मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या कुटूंबातील दोन सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी अशा मागण्या या निवेदनात आहेत.