सेवेचा विचार, विकासाची दृष्टी : प्रभाग ६ मधून क्षितिज जाधव यांना तिकीट

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तिकीट नागरिकांमध्ये उत्साह; ‘आदर्श नगरसेवक’ म्हणून क्षितिज जाधव यांच्याकडे अपेक्षेने पाहिले जात आहे

दि. ३० नांदेड (उपसंपादक; सतीश वागरे) नगरसेवक हे पद सत्तेचा उपभोग घेण्यासाठी नसून नागरिकांच्या सेवेसाठी असते, अशी स्पष्ट व ठाम भूमिका सातत्याने मांडणारे सामाजिक कार्यकर्ते क्षितिज जाधव हे भविष्यातील आदर्श नगरसेवक ठरू शकतात, असे मत आज नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) यांच्याकडून प्रभाग क्रमांक ६ साठी क्षितिज जाधव यांना नगरसेवकपदाचे तिकीट देण्यात आल्याने स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे. नगरसेवकांनी स्वतःला लोकांचा मालक नव्हे, तर लोकांचा सेवक समजले पाहिजे, असे सांगताना क्षितिज जाधव यांनी लोकप्रतिनिधीपदाचा खरा अर्थ अधोरेखित केला आहे. त्यांच्या मते, नगरसेवकांची सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या समजून घेणे आणि त्या प्रामाणिकपणे महापालिका सभागृहात मांडणे होय. पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वीज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणे हे नगरसेवकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी “विकासाचा पहारेकरी” ही संकल्पना मांडली. विकास निधीचा वापर कुठे आणि कसा होतो, यावर लक्ष ठेवणे, निकृष्ट व अपूर्ण कामांवर आवाज उठवणे, तसेच कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांमधील संगनमताला विरोध करणे, ही नगरसेवकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पारदर्शक आणि दर्जेदार विकासासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका निर्णायक ठरते, असा त्यांचा विश्वास आहे. प्रशासनाशी संबंधांबाबत बोलताना त्यांनी नगरसेवक केवळ “शिफारसदार” बनण्याच्या प्रवृत्तीवरही टीका केली. अधिकाऱ्यांवर लोकशाही नियंत्रण ठेवणारा, प्रश्न विचारणारा आणि नियमबाह्य कामांना निर्भीडपणे विरोध करणारा प्रतिनिधी हीच खरी नगरसेवकाची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरही क्षितिज जाधव यांनी विशेष भर दिला. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, दिव्यांग व गरीब घटकांचे प्रश्न प्राधान्याने मांडले गेले पाहिजेत. विस्थापन, अन्याय आणि भेदभावाविरोधात ठामपणे उभे राहणारा नगरसेवकच खऱ्या अर्थाने लोकांचा प्रतिनिधी ठरतो, असे ते म्हणाले.नागरिकांशी सतत संवाद राखणे ही लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नियमित जनता दरबार, वस्तीपातळीवरील बैठका तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट संवाद ठेवण्यावर त्यांनी भर दिला. नगरसेवक हा निवडणुकीपुरता नव्हे, तर कायम लोकांमध्ये राहणारा असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राजकारणात पक्षनिष्ठेपेक्षा शहरहित व जनहिताला प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे मत मांडताना त्यांनी चुकीच्या निर्णयांना “पक्षाचा आदेश आहे” म्हणून पाठिंबा देणे अयोग्य असल्याचे सांगितले. गरज पडल्यास जनहितासाठी पक्षाच्या भूमिकेविरोधात उभे राहण्याची तयारी नगरसेवकांकडे असली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.अखेरीस आदर्श वर्तनाबाबत बोलताना त्यांनी भ्रष्टाचार, जाती-धर्माचे राजकारण, धमकी, दहशत व बेकायदेशीर दबाव यापासून दूर राहण्याचा संदेश दिला. स्पष्ट विचार, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे उमेदवार म्हणून क्षितिज जाधव यांच्याकडे नागरिक आशेने आणि विश्वासाने पाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top