शब्दांच्या मौनात उरलेले विनोद कुमार शुक्ल- सतीश वागरें

अग्रलेख : विनोद कुमार शुक्ल यांच्या निधनाने मराठी वाचक आणि साहित्य रसिकांच्या मनात एक अदृश्य, पण जाणवत राहणारी जागा निर्माण झाली आहे. त्यांची कविता ही केवळ शब्दांची रचना नव्हे, तर एका विशिष्ट भाव-भूमीचा, मौनाचा आणि अनुभवाच्या सूक्ष्म अंतरंगाचा आविष्कार होती. वरील कवितेत त्यांच्याच शब्दांनी त्यांच्यावरच श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे, आणि तोच त्यांच्या साहित्यिक वारसाचे सारखा वाटतो. शुक्ल यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘न घडलेल्या गोष्टीं’ची, ‘न ऐकल्या गेलेल्या आवाजा’ची आणि ‘न उमटलेल्या पावलां’ची जिवंत उपस्थिती. त्यांचे शब्द ज्या गोष्टी नाहीत त्यांच्या भोवतीही एक प्रकाशपट्ट निर्माण करतात. ‘जे कधीच माझ्या घरी येणार नाहीत, त्यांचाच विचार मी करतो’, ही ओळ केवळ काव्यात्मक नाही, तर एक समग्र जगदृष्टी आहे. ही दृष्टी अनुपस्थितीतून उपस्थिती शोधते, मौनातून संवाद घडवते.त्यांची कविता ‘गर्दीत राहूनही एकटी’ आणि ‘एकटेपणातही माणसांनी भरलेली’ होती. हा विरोधाभास त्यांच्या साहित्याचे मूलगामी सूत्र आहे. आधुनिक जीवनाच्या एकाकी पणातूनही मानवी संबंधांची ऊर्जा, समाजाचा आलेख त्यांच्या शब्दांत सतत हसरत राहिला. न लिहिलेल्या शब्दांतही बोलणारे मौन, विनोद कुमार शुक्ल हे त्याचे साक्षात्कर्ते आणि शिल्पकार होते. त्यामुळेच, आज ते शारीरिकरित्या आपल्याबरोबर नसतानाही, त्यांचे शब्द आणि त्यांच्यामागे राहिलेले मौन आपल्याला एकटे पडू देत नाही. जे काय नसले आहे, जे आले नाही, जे गेले गेले ते त्यांच्या साहित्यातून ते सतत प्रकाशित आणि प्रखर होत राहते. त्यांचा जाणे म्हणजे फक्त एक व्यक्तीचे जाणे नव्हे, तर एका विशिष्ट संवेदनशीलतेचा, एका निराळ्या पाहण्याच्या पद्धतीचा अस्त होय. पण ते आपल्यासाठी शब्द आणि मौन यांचा असा ठेवा ठेवून गेले आहेत, की त्यांचा विचार, त्यांची कविता आपल्यासोबत उभी राहील ‘शांत, संयत, खोल’. —एक भावपूर्ण नमन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top