शहरातील विद्यार्थ्याचा ‘जीवन क्षेत्र पुनर्संचयित’ विषयावर भाभा परीक्षेत दिमाखदार प्रकल्प

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या आर्यन देवसरकरची मुंबई येथे प्रकल्प सादरीकरणासाठी निवड, औद्योगिक प्रदूषणामुळे बिघडलेले पर्यावरणीय समतोल पुनर्संचयित करण्यासाठी सुक्ष्म उपाययोजना सुचवल्या

नांदेड, दि. २९ ( विशेष प्रतिनिधी) : शहरातील एका सहावीतील विद्यार्थ्याने केलेल्या संशोधनाने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात नवी दिशा दाखवून दिली आहे. वाढत्या औद्योगिकीकरण व शहरीकरणामुळे बिघडलेले पर्यावरणीय संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेणारा एक भक्कम प्रकल्प सादर करून या तरुण शास्त्रज्ञाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, वाडी बु येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या आर्यन चंद्रकांत देवसरकर याने अत्यंत प्रतिष्ठेच्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेचे पहिले दोन टप्पे यशस्वीरीत्या पार केले आहेत. त्याच्या प्रकल्पाचा दर्जा लक्षात घेऊन त्याची राज्यस्तरीय प्रकल्प सादरीकरणासाठी मुंबई येथे निवड करण्यात आली होती. आर्यनने ‘Restoring the Zone of Life’ (जीवन क्षेत्र पुनर्संचयित) या विषयावर आपले संशोधन सादर केले.आर्यनच्या संशोधनानुसार, ‘झोन ऑफ लाइफ’ म्हणजे मानव, प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यातील संतुलित सहअस्तित्वाने निर्माण झालेले पर्यावरणीय क्षेत्र होय. मात्र, औद्योगिक धूर, रासायनिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि झपाट्याने होणारी वृक्षतोड यामुळे हे नाजूक संतुलन कोलमडत आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, परिणामी हवामान बदल, जलस्रोतांचे प्रदूषण आणि जैवविविधतेत झपाट्याने होणारी घात या समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. आर्यनने आपल्या प्रकल्पात केवळ समस्या मांडल्या नाहीत, तर त्या सोडविण्यासाठी ठोस उपाय सुचवले आहेत. त्याच्या संशोधनानुसार, जीवन क्षेत्र पुनर्संचयित करण्यासाठी औद्योगिक सांडपाण्याचे प्रभावी शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर करणे, प्रदूषण कमी करण्यासाठी सौर व पवन ऊर्जेसारख्या अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवणे, पावसाळी पाण्याचे योग्य नियोजन व साठवण करून जलस्रोतांचे संवर्धन करणे, शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून स्थानिक प्रजातींचे संवर्धन करणे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे. या सर्व उपाययोजनांमुळे हवा व पाण्याची गुणवत्ता सुधारून नैसर्गिक परिसंस्था पुन्हा सशक्त होऊ शकेल, असा विश्वास आर्यनने व्यक्त केला आहे. अत्यंत लहान वयात पर्यावरण संरक्षणाचा सखोल विचार करून, समाजापुढे एक जबाबदार नागरिकत्वाचा आदर्श ठेवल्याबद्दल शालेय शिक्षक व पालकांनी आर्यनचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top