हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षकाला लोकसंवाद पुरस्कार; ग्रामीण वास्तवाशी नाळ जोडणाऱ्या शिक्षणसेवेचा लोकसंवाद पुरस्काराने गौरव

दि. २८ नांदेड : (जिल्हा प्रतिनिधी) शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे आपल्या कृतीतून सातत्याने सिद्ध करणारे नाव म्हणजे प्रा. संतोष गिरी.ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी उचललेली पावले आज अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरली आहेत. या संवेदनशील व समाजाभिमुख कार्याची दखल घेत “लोकसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या” प्रतिष्ठित पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.सन २०११ पासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा. संतोष गिरी यांनी “गिरी केमिस्ट्री क्लासेस” या छोट्या उपक्रमातून अध्यापनाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या गरजा, अडचणी आणि सामाजिक वास्तव ओळखत त्यांनी आपले कार्य विस्तारले आणि आज “गिरी पीसीएमबी क्लासेस” ही संस्था नांदेड शहरातील विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचे केंद्र बनली आहे. ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ आर्थिक कारणांमुळे अर्धवट राहते, ही वेदना लक्षात घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून “सातबारा दाखवा ५० टक्के फी माफी” हा उपक्रम त्यांनी सातत्याने राबवला. भूमिहीन, कष्टकरी, अनाथ व सिंगल पेरेंट विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलती देत शिक्षण सर्वांसाठी सुलभ करण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.आजपर्यंत साडेचार ते पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन देत त्यांच्या करिअरची पायाभरणी करण्याचे कार्य या संस्थेमार्फत झाले आहे. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन सावरण्यात “गिरी पीसीएमबी क्लासेसचा” मोलाचा वाटा असून ही संस्था अनेक कुटुंबांसाठी आशेचा आधार ठरली आहे.“विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेणारे क्लासेस” अशी वेगळी ओळख निर्माण करत “रोज पढाई-रोज परीक्षा” या उपक्रमातून नियमित अभ्यास, चाचण्या आणि मूल्यमापनावर भर देण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी शिस्तबद्ध अभ्यासाच्या सवयीला लागून आत्मविश्वासाने पुढे जात आहेत.शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन यांचा समतोल साधत शांत, संयमी आणि मृदू भाषेत शिक्षणाचा प्रकाश पसरवणाऱ्या प्रा. संतोष गिरी यांच्या कार्याचा हा “लोकसंवाद पुरस्कार” म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन समाजसेवेचा सन्मान आहे. या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत असून अनेक विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.