
नांदेड, दि.२० (नांदेड : प्रतिनिधी )
श्री यादव अहीर गवळी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सशक्तीकरणाचा वस्तुपाठ ठरणारा २५ वा आंतरराज्यीय स्वजातीय सामूहिक विवाह सोहळा येत्या २ व ३ फेब्रुवारी २०२६ रोजी नांदेड येथे अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध स्वरूपात संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात ३१ वधू-वरांची जोडपी विवाहबद्ध होणार असून, निमित्ताने नांदेड शहरात समाजबांधवांचा मोठा मेळावा भरत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या रौप्य महोत्सवी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आधीच ३१ विवाहांचे नियोजन निश्चित करण्यात आले होते. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ठरलेल्या वेळापत्रकानुसार आणि पारंपरिक विवाह विधींच्या माध्यमातून सर्व विवाह पार पाडले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हा उपक्रम केवळ विवाह विधींपुरता मर्यादित न राहता, समाजप्रबोधन, एकात्मता आणि सुधारणा यांचा व्यापक संदेश देणारा ठरत आहे.लग्नसमारंभातील अवाजवी खर्च टाळून सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक दिलासा देणे, साधेपणा, समानता आणि पारदर्शकतेची भावना रुजवणे, हा या सामूहिक विवाह सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे समाजातील अनेक कुटुंबांनी आनंदाने या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या २४ सामूहिक विवाह सोहळ्यांमधून जवळपास ९०० विवाह यशस्वीपणे पार पडले असून, नांदेड हे या सामाजिक चळवळीचे केंद्र बनले आहे.हा भव्य सोहळा नरहर कुरुंदकर हायस्कूल, कौठा (नांदेड) येथे आयोजित करण्यात आला आहे. विवाह विधींसाठी स्वतंत्र मंडप, पाहुण्यांसाठी चहा, उपवासाचा फराळ, भोजन व्यवस्था आदींचे काटेकोर आणि शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विवाह विधींसह समाजबांधवांना एकमेकांशी भेटीगाठी, नवीन ओळखी आणि नातेबंध निर्माण करण्याची संधी मिळणार आहे.रौप्य महोत्सवी या आंतरराज्यीय सामूहिक विवाह सोहळ्यास महाराष्ट्रासह विविध राज्यांतील यादव गवळी समाजाचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर सहकुटुंब उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक प्रेरणादायी ठरणार आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरसिंग मंडले, धनलाल भगत, प्रेमलाल जाफराबादी, दुर्गाप्रसाद बटावाले, शरद मंडले, गणेशलाल भातेवाले, भारत रौत्रे, जगदीश लखनावाले, राजू बटावाले, कैलाश मंडले, नंदलाल लँकाढाई, अर्जुन बंकूवाले, गजानन यादव, बबलू लखनावाले, बाबा परीवाले, अर्जुन कूटलिया, भुरालाल लँकाढाई, गिरीश यादव, सुंदरलाल भातेवाले तसेच सर्व आयोजन समिती, स्वयंसेवक आणि समाजातील कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.समाजातील प्रत्येक घटकाने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होऊन नवदांपत्यांना आशीर्वाद द्यावेत आणि सामाजिक एकतेच्या या उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.