
जळगाव, दि. १७ (बातमीदार) गुलाबराव देवकर महाविद्यालयातील फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने प्राचार्यांच्या मारहाणीला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या वडिलांच्या फिर्यादीवरून प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, श्याम याने रविवारी रात्री उशिरा घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या नोटमध्ये श्यामने लिहिले आहे की, मित्रांतील वादात मध्यस्थी करत असताना प्राचार्य पवार यांनी त्याला शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर पीव्हीसी पाइपने बेदम मारहाण केली. तसेच अपमानास्पद शिवीगाळ केल्याचे त्याने नमूद केले आहे. “गुरू मारतात हे माहीत आहे, पण इतके नाही,” अशी वेदनादायक नोंद या चिठ्ठीत आढळून आली आहे.घटनेची माहिती कळताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईक व विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनी मोठी गर्दी केली होती. प्राचार्यांवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबियांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, मृताचे वडील प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्राचार्य योगेश पवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर पोलिस करत आहेत.या घटनेमुळे विद्यार्थी वर्गात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, प्राचार्यांची बाजू समोर आलेली नसली तरी, सुसाईड नोटमधील आरोपांनी शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.