शिक्षणातून माणूस घडवणाऱ्या शिक्षक परंपरेचा राष्ट्रीय गौरव : प्रा. संतोष गिरी सन्मानित

प्रा. गिरी यांची शिक्षण प्रणाली समता, संधी आणि संवेदनशीलतेवर आधारलेली आहे. आर्थिक अडचणी शिक्षणात अडथळा ठरू नयेत, यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मार्ग दाखवला. हीच शिक्षणातील खरी सामाजिक बांधिलकी ठरते.

दि. ३ नवी दिल्ली | (विशेष प्रतिनिधी) आजच्या काळात शिक्षण हे अनेकदा केवळ कमाईचे साधन बनत चालले आहे. अशा वेळी एखादा शिक्षक विज्ञान शिकवतानाच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याची दखल देशपातळीवर घेतली जाते. रसायनशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आणि सामाजिक जाणिवेचे भान असलेले शिक्षक प्रा. संतोष गिरी यांना नवी दिल्लीत मानद डॉक्टरेट (डी. लिट.) प्रदान करण्यात आली.पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सोहळ्यात पद्मश्री डॉ. अरविंद कुमार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, शिक्षणातून समाज घडवणाऱ्या शिक्षक परंपरेचा गौरव ठरला.गेल्या १२ वर्षापासून प्रा. गिरी यांनी रसायनशास्त्राला वर्ग खोली पुरते मर्यादित ठेवले नाही. विज्ञान ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विज्ञान अवघड आहे, ही भीती दूर करत, सोप्या भाषेत आणि उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी रसायनशास्त्र शिकवले. त्यांनी उभारलेल्या सरली कृत प्रयोगशाळा आजच्या शिक्षण व्यवस्थेसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.प्रा. गिरी यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षणातून सामाजिक न्याय. शिक्षण महाग होत असताना, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची अडचण ओळखून त्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून केवळ सातबारा उतारा दाखवून ५० टक्के शुल्क सवलत देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कोणत्याही सरकारी आदेशापेक्षा मोठा आणि मोलाचा मानला जात आहे.ग्रामीण भागातील मुलींना विज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सुरू केलेली ‘रसायन सखी’ मोहीम विशेष लक्षवेधी ठरली आहे. आजही विज्ञान हे शहरां पुरते मर्यादित आहे अशी धारणा असताना, प्रा. गिरी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे काम केले आहे.दिल्लीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी प्रा. गिरी यांच्या कार्याचे कौतुक केले. नफ्याच्या स्पर्धेत अडकलेल्या शिक्षण व्यवस्थेत त्यांनी शिक्षणाला सामाजिक बदलाचे साधन बनवले, असे मत अनेकांनी व्यक्त केले.ही मानद डॉक्टरेट म्हणजे त्यांच्या संशोधनाचा सन्मान आहेच, पण त्याहून अधिक म्हणजे त्यांनी घडवलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा गौरव आहे. शिक्षण हा व्यवसाय नसून मानवी हक्क आहे, ही भूमिका जपणारे प्रा. संतोष गिरी यांचे कार्य युवा शिक्षकांसाठी आणि समाजासाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे सर्व स्तरांमधून प्राध्यापक डॉक्टर संतोष गिरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top