अलवरमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थिनीं सोबतच्या व्हिडिओने उडवली खळबळ

विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. या व्हिडिओमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. शनिवारी ग्रामस्थांनी शाळेत जाऊन निदर्शने केली आणि पोलिसांना माहिती दिली.

दि. २३ अलवर (संपादक) ———————- राजस्थानातील अलवर जिल्ह्यात सरकारी शाळेच्या मुख्याध्यापका संदर्भातील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना तैराकी शिकवण्याच्या नावाखाली धरणावर नेण्यात आले होते. या ठिकाणी मुख्याध्यापक विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत असल्याचा दावा व्हिडिओच्या आधारे केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर राजकीय उच्च माध्यमिक विद्यालय, पडाक छापली येथील इयत्ता नववी ते बारावीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक लालचंद मीणा यांनी सारिस्का जंगला लगतच्या भराज धरण परिसरात नेले. या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थिनींचा समावेश होता. विशेष म्हणजे या वेळी एकही महिला शिक्षिका उपस्थित नसल्याची माहिती समोर आली आहे. धरण परिसरात विद्यार्थ्यांना पाण्यात उतरवण्यात आल्याचे सांगण्यात येते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात यापूर्वी बुडण्याच्या घटना घडल्या असून पाण्याची खोलीही मोठी आहे. असे असतानाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप आहे. दरम्यान, प्रकरणाची गंभीर दखल घेत राजस्थानच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापक लालचंद मीणा यांना २२ ऑगस्ट रोजी तात्काळ प्रभावाने निलंबित केले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय बिकानेर येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. थानागाजी ब्लॉक शिक्षण अधिकारी शकुंतला यादव यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती आहे. दुसरीकडे, स्थानिक पोलिसांकडूनही प्राथमिक तपास सुरू असून संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओचीही पडताळणी केली जात आहे. या प्रकरणात विद्यार्थिनी किंवा त्यांच्या पालकांकडून अद्याप लेखी तक्रार दाखल झाल्याची माहिती नसली, तरी व्हिडिओ आणि उपलब्ध माहितीनुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे. चौकशीनंतर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आणि पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या शिक्षकाकडूनच नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याची भूमिका पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top