रक्षाबंधनासाठी माहेरी आली, पण परतीचा प्रवास झाला अखेरचा; रस्त्यातच स्तनदा मातेचा मृत्यू

सात किलोमीटर रस्ता झाला जीवघेणा; बांबूच्या झोळीतून नेत असतानाच स्तनदा मातेने सोडले प्राण, बांबूच्या झोळीतून रुग्णालयाकडे जाणाऱ्या महिलेने वाटेतच प्राण सोडले, हा अपघाती मृत्यू नाही, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे निर्माण झालेल्या व्यवस्थेच्या अपयशाचा आरसा आहे.

दि. २४ नंदुरबार (उप -संपादक) : ——————– रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या एका स्तनदा मातेची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी तिला आरोग्य केंद्रात नेण्याची वेळ आली, मात्र रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. अखेर ग्रामस्थांनी बांबूची झोळी तयार करून तिला उपचारासाठी नेण्यास सुरुवात केली. मात्र, आरोग्य केंद्र गाठण्यापूर्वीच दुखणे असह्य झाल्याने त्या महिलेने रस्त्यातच प्राण सोडले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम वेहगी-बारीपाडा परिसर येथील सातपुड्या येथील घटना एका महिलेचा मृत्यू नाही, दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था आणि मूलभूत सुविधांच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. बारीपाडा ते वहेगी हे अंतर अवघे सात किलोमीटर. मात्र या सात किलोमीटरच्या अंतरासाठी आजही पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. विशेषतः गर्भवती महिला, स्तनदा माता, वृद्ध आणि गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने रुग्णांना झोळी, बैलगाडी किंवा इतर उपलब्ध साधनांच्या मदतीने उपचारासाठी न्यावे लागते.रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या या स्तनदा मातेची प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने तिला उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रस्त्याअभावी निर्माण झालेल्या अडचणींमुळे तिच्या उपचाराला विलंब झाला. अखेर बांबूच्या झोळीतून तिला नेत असतानाच तिची प्रकृती अत्यवस्थ झाली आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेने ‘विकास’ नेमका कोणासाठी आणि कुठ पर्यंत पोहोचला आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. शहरांमध्ये आधुनिक आरोग्यसेवा आणि रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध असताना सातपुड्यातील आदिवासी नागरिकांना आजही रुग्णाला बांबूच्या झोळीतून दवाखान्यात न्यावे लागते, ही परिस्थिती प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. एका महिलेचा मृत्यू केवळ आजारामुळे झाला की रस्त्याच्या अभावामुळे उपचार मिळण्यास झालेल्या विलंबामुळे तिचा जीव गेला, याची प्रशासनाने गांभीर्याने चौकशी करणे गरजेचे आहे. बारीपाडा-वहेगी परिसरातील सात किलोमीटरचा रस्ता तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, तसेच दुर्गम भागात कायमस्वरूपी आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय वाहतूक उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top