लेखणी जेव्हा हृदयाची होते…

लेखणी जेव्हा हृदयाची होते, तेव्हा फक्त लेखणी नसते, ती एखाद्या कुटुंबाची वाट काढणारी कहाणी…

दि. २७ संपादकीय : —————————————————— पत्रकारिता केवळ घटनांचा नोंदवही नाही, तर समाजाच्या प्रगल्भ मनाचा आरसा आहे. ‘जे घडते ते लिहिणे’ इतकाच तिचा धर्म नव्हे, तर ‘जे घडून गेले त्यातून काय बदलता येईल’ या दिशेने विचार करणे ही तिची खरी जबाबदारी आहे. प्रा. शरद वाघमारे यांनी आपल्या लेखणीतून हेच सिद्ध केले. २०१३ मधील एक कडक उन्हाळ्याचा दिवस, मालेगावचे बसस्थानक, उन्हाने वितळणारा डांबर आणि रस्त्याच्या कडेला दोन अल्पवयीन भाऊ राजेश आणि मंगेश हातात पॉलिशची डबी आणि पाठीवर शाळेची झोळी.

वडील आनंदा अन्नपूर्वे यांचे शेजारच्या भांडणात अकाली निधन झाल्याने या दोन बालकांवर संसाराचे ओझे आले होते. सातवीत शिकणारा राजेश आणि चौथीतील मंगेश ज्या वयात हातात पुस्तके शोभतात, त्या वयात ब्रश आला होता. प्रा. वाघमारे यांच्यातला पत्रकार केवळ घटना नोंदवून थांबला नाही, तर त्या वेदनेला स्पर्श करून गेला. त्यांनी ‘दैनिक लोकमत’ मधून ही बातमी लिहिली “वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकांवर बूट पॉलिश करण्याची वेळ” हे शीर्षक वाचताच अनेकांचे डोळे भरून आले. कारण ती फक्त बातमी नव्हती, तर एक हृदयस्पर्शी कृदंत होते. ज्या लेखणीत करुणा असेल, ती समाजाचे डोळे उघडू शकते. आणि हेच घडले. या एका बातमीने महाराष्ट्र हलून निघाला.

https://www.facebook.com/share/p/1CqaEqSdY4

सामाजिक संस्था, सेवाभावी व्यक्ती, दानशूर हात सर्वत्र मदतीची लाट उसळली. कोणी आर्थिक मदत केली, कोणी शिक्षणाची व्यवस्था केली, कोणी घरी जेवण पोहोचवले. त्या दोन भावांच्या अंगणात पुन्हा शिक्षणाचा सूर गुंजला. पत्रकारितेचा खरा अर्थ अर्थातच फक्त बातमी छापणे नव्हे, तर त्या बातमी मागच्या माणसापर्यंत पोहोचणे आहे. प्रा. वाघमारे यांची लेखणी दुसऱ्या मार्गाने गेली. त्यांनी वेदनेची बातमी केली नाही, तर त्या वेदनेवर मलमपट्टी करण्याची कृती केली.

आज तोच राजेश पुणे शहर पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत आहे, तर मंगेश समाजकल्याण विभागात. ज्या हातात एकेकाळी बूट पॉलिशचा ब्रश होता, त्या हातांनी आज यशाचे शिखर गाठले आहे. डोळ्यात तीच जिद्द, पण आता स्वाभिमानाचा गर्व. ही केवळ दोन भावांची यशोगाथा नाही, तर संकटावर मात करणाऱ्या मानवी जिद्दीची आणि संवेदनशील पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेची जिवंत कहाणी आहे.

प्रा. वाघमारे यांनी पत्रकाराचा धर्म पुन्हा एकदा परिभाषित केला. लेखणीने केवळ दोष न दाखवता, तो दोष दूर करण्यासाठी खंबीरपणे उभे राहावे. जेव्हा लेखणी हृदयाची असते, तेव्हा ती फक्त शाई पसरवत नाही, तर आशेचे दीप लावते. प्रा. शरद वाघमारे सर, आपल्या या संवेदनशील पत्रकारितेमुळे हे सर्व घडले. आपल्या लेखणीचे आणि आपल्या कर्तृत्वाचे हजारों सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top