मराठवाडा मुक्तीचा लढा अन् विद्यापीठाची ३२ वर्षांची ज्ञानगंगा; स्वा.रा.ती.विद्यापीठात रांगोळी, भित्तीपत्रक स्पर्धेतून क्रांतीगाथा जीवंत!

दि १२ नांदेड (विशेष प्रतिनिधी): ——————— मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दैदिप्यमान आणि वैभवशाली इतिहास, सोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा गेल्या ३२ वर्षांचा यशस्वी ज्ञानप्रवास या दोन्ही ऐतिहासिक पर्वांना उजाळा देणारा कलात्मक सोहळा नुकताच विद्यापीठात पार पडला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि विद्यापीठ वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्ञान स्रोत केंद्र व विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय भित्तीपत्रक, रांगोळी स्पर्धा आणि भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते फीत कापून या त्रिविध सोहळ्याचे अत्यंत उत्साहात उद्घाटन झाले. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान आणि विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात मारलेली गरुड भरारी, याचा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या कला कृतीं मधून पाहायला मिळाला. चारही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांतील वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला कलाविष्कार घडवला. रांगोळी स्पर्धेत १८ तर भित्तीपत्रक स्पर्धेत २९ स्पर्धकांनी भाग घेत मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रसंग आणि विद्यापीठाची वाटचाल आपल्या रेषा व रंगांच्या माध्यमातून जिवंत केली.

पारदर्शक परीक्षण आणि मान्यवरांची उपस्थिती स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैजयंता पाटील, डॉ. सुनिता पाटील, डॉ. रुपाली जैन, डॉ. दिपाली साबळे, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. वैजनाथ अनमुलवाड आणि डॉ. उषा सांगळे या तज्ज्ञ परीक्षकांनी अत्यंत पारदर्शकपणे केले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्ञान स्रोत केंद्राचे प्र. संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, ‘रासेयो’ संचालक डॉ. मारोती गायकवाड आणि अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमाला विविध महाविद्यालयांचे संघप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, संशोधक व विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अरुण हंबर्डे, संदीप डहाळे व विठ्ठल मोरे यांनी विशेष नियोजन केले. तसेच के. एस. सिद्दिकी, मोहनसिंग पुजारी, माधव लुटे, प्रमिला बडगे, नितीन राठोड, दयानंद पोपळे, तिरुपती हंबर्डे व योगेश हंबर्डे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या कलात्मक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top