
नांदेड, दि. ९ : (जिल्हा प्रतिनिधी) ————- जिल्ह्यातील विविध नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी व इतर प्रश्नांसंदर्भात समाज कल्याण कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांनी समाज कल्याण कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन सादर करून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मार्गी लावण्याची विनंती केली. न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने पाहून सकारात्म्क निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नर्सिंग अभ्यासक्रमातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणातील विलंब व आर्थिक बाबींमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, या प्रश्नांची दखल घेऊन त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी युवक काँग्रेसने केली आहे. विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे यांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले असून, प्रशासनाने आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. या मागण्या तातडीने मान्य न केल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांनी दिला.या निवेदनाची प्रत सहाय्यक संचालक, इतर मागासवर्गीय विभाग तसेच संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.