“न्यूयॉर्क” मध्ये नांदेडच्या प्राध्यापकाचा गौरव

डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांना ‘ग्लोबल ग्रीन टीचर अवॉर्ड २०२६’

नांदेड, दि. २९ सप्टेंबर : (जिल्हा प्रतिनिधी) ——– स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांच्या शैक्षणिक, तंत्रज्ञानाधारित आणि पर्यावरणपूरक कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. न्यूयॉर्क येथे झालेल्या दहाव्या ‘एनवायसी ग्रीन स्कूल कॉन्फरन्स’मध्ये त्यांना ‘ग्लोबल ग्रीन टीचर अवॉर्ड २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.‘क्लायमेट वीक एनवायसी’ च्या निमित्ताने न्यूयॉर्कमधील ‘एसयूएनवाय ग्लोबल सेंटर’ येथे हा पुरस्कार सोहळा झाला. न्यूयॉर्कचे राज्य सेनेटर गुस्तावो रिवेरा आणि न्यूयॉर्क महापौर कार्यालयाचे उपप्रमुख दिलीप चौहान यांच्या हस्ते डॉ. रेड्डी यांनी पुरस्कार स्वीकारला. विद्यापीठातील १५ वर्षांच्या सेवाकाळात डॉ. रेड्डी यांनी शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी विविध उपक्रम राबविले. मोफत आणि मुक्त स्रोत संगणकीय साधने तसेच ‘स्वयम्’ च्या माध्यमातून १२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचविण्यात त्यांनी योगदान दिले.कोरोना महामारीच्या काळात शिक्षणाची पद्धत बदलली. या काळात देशभरातील १७ हजारांहून अधिक शिक्षकांना डिजिटल शिक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी केले. विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात कागदाचा वापर कमी व्हावा, कामकाज अधिक पारदर्शक व्हावे आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी डॉ. रेड्डी यांनी ‘विद्यापीठ माहिती व्यवस्थापन प्रणाली’ विकसित केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती-विज्ञान आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील बदलत्या जगासाठी तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचीही पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली. पुरस्कार स्वीकारताना डॉ. रेड्डी यांनी हा सन्मान आपल्यासाठी अभिमानाचा आणि भावूक करणारा क्षण असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणाबाबत जागरूक, समान संधी देणारी आणि सर्वांसाठी सुलभ शिक्षण व्यवस्था उभारण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे नवी ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.आई बी. सुभद्राम्मा, बंधू बी. गजेंद्रनाथ रेड्डी, पत्नी डॉ. रुपाली एस. जैन आणि मुले हार्दिक व रोहित यांच्या पाठिंब्याचा आपल्या यशात मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘ग्रीन मेंटर्स’चे डॉ. वीरेंद्र रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.नांदेडच्या विद्यापीठातील प्राध्यापकाच्या कार्याची न्यूयॉर्कमध्ये झालेली दखल ही विद्यापीठासाठी तसेच मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top