सिग्नलशी छेडछाड करून रेल्वे थांबवली अन् दागिने लुटले; रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

रेल्वे पोलीस व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप

विशेष प्रतिनिधी | सातारा
मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने धावणाऱ्या महत्त्वाच्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अत्यंत थरारक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद आणि सालपे रेल्वे स्थानकांदरम्यान अज्ञात चोरट्यांनी पूर्वनियोजित कट रचून थेट रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक छेडछाड केली आणि धावती ट्रेन थांबवली. त्यानंतर अंधाराचा व पहाटेच्या वेळेचा फायदा घेऊन डब्यांमधील महिला प्रवाशांना लक्ष्य करत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळकावून पोबारा केला. रविवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर तसेच ढिसाळ कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी एक्स्प्रेस सातारा जिल्ह्यातील सालपे परिसराचा टप्पा ओलांडत असताना अज्ञात चोरांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत पद्धतशीरपणे हस्तक्षेप केला. सिग्नल लाल झाल्यामुळे रेल्वेला नाइिलाजास्तव जागीच थांबावे लागले. गाडी थांबताच आधीपासूनच दबा धरून बसलेले आणि पूर्वनियोजित बेत आखलेले चोरटे थेट रेल्वेच्या आरक्षित डब्यात शिरले. पहाटेची वेळ असल्याने प्रवासी गाढ झोपेत होते. नेमक्या याच परिस्थितीचा लाभ घेत चोरांनी महिला प्रवाशांना लक्ष्य केले. त्यांच्या गळ्यातील व अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेत चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. डब्यामध्ये अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. प्रवाशांनी मोठी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत अज्ञातांनी अंधाराचा गैरफायदा घेत पोबारा केला होता. या घटनेत किती महिला प्रवाशांचे दागिने चोरीला गेले आणि चोरीच्या मुद्देमालाची नेमकी किंमत किती, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही; परंतु या घटनेने रात्रीच्या रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचे धिंडवडे निघाले आहेत.
​या गंभीर घटनेने रेल्वे पोलीस प्रशासन आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर अत्यंत संतापजनक प्रश्न निर्माण केले आहेत. गाडी थांबवण्यासाठी सिग्नल यंत्रणेत बाहेरून छेडछाड केली जाते, याचा अर्थ यामागे मोठे षड्यंत्र किंवा सराईत गुन्हेगारांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. असे असतानाही रेल्वे प्रशासनाला किंवा पोलीस यंत्रणेला अशा गुन्हेगारी कृत्यांची कुणकुणही लागत नाही, हे अत्यंत शरमेचे आहे. वारंवार रेल्वे गाड्यांमध्ये चोऱ्या होणे, प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालणे आणि रात्रीच्या वेळी मार्गावर कोणतीही प्रभावी गस्त किंवा सुरक्षा यंत्रणा न असणे, हे रेल्वे पोलिसांच्या हलगर्जीपणाचे आणि निष्कर्मीपणाचे लक्षण आहे. गुन्हेगार सहजपणे सिग्नल यंत्रणा बदलून दरोडे टाकत असतील, तर मग रेल्वेचे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस नेमकी काय कामे करतात? असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस केवळ कागदी घोडे नाचवण्यात मग्न असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ते पूर्णपणे असंवेदनशील, हतबल आणि बिनकामाचे ठरल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

चौकट

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरवशावर?महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील दरोड्याच्या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून धावती रेल्वे थांबवणे आणि त्यानंतर महिला प्रवाशांचे दागिने लुटणे, हा प्रकार रेल्वे सुरक्षा व्यवस्थेसमोरील गंभीर आव्हान आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना तातडीने अटक करावी. तसेच रेल्वेमार्गावरील गस्त वाढवून रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना ठोस सुरक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top