
नांदेड | २७ जून (जिल्हा प्रतिनिधी): ——————— वॉर्ड क्र. १६ मधील नागरिकांच्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घरपोच कचरा संकलनाच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, आजपासून हातगाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या सहा वर्षांपासून घरपोच कचरा संकलन सेवा बंद असल्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ. कैलाश भानुदास यादव यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने निवेदने, पाठपुरावा आणि प्रत्यक्ष भेटी घेतल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर प्रशासनाने या सेवेला पुन्हा मंजुरी दिली. आज सकाळी उपमहापौर दीपकसिंह रावत, नगरसेवक तुळजाराम यादव, नगरसेविका अमृताबाई ठाकूर आणि रुची भारतीया यांच्या उपस्थितीत हातगाड्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे आवाहन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गोकुळ यादव यांनी वॉर्डातील विविध भागात फिरून नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली. स्वच्छ परिसर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या निर्णयाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत, आता कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल, परिसर अधिक स्वच्छ राहील आणि आरोग्याच्या समस्या कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी तसेच सातत्याने पाठपुरावा करणारे डॉ. कैलाश भानुदास यादव आणि जनजागृती करणारे गोकुळ यादव यांच्या प्रयत्नांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.