‘रुग्ण हाच देव’ या मूल्याला न्याय देणाऱ्या सेवेला ‘लोकमत नांदेड गौरव २०२६’चा डॉ. अर्जुन शेळके यांचा सन्मान

वैद्यकीय सेवेसह सामाजिक बांधिलकीचाही गौरव, समाजातील शेवटच्या घटका पर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याची त्यांची धडपड आणि सेवाभाव भविष्यातील वैद्यकीय पिढी साठीही आदर्श ठरणारा आहे.. नांदेड दि. ३० (उपसंपादक : सतीश वागरे) : ————- डॉक्टर हा केवळ उपचार करणारा तज्ज्ञ नसतो, तर संकटाच्या क्षणी रुग्णाला धीर देणारा, आशेचा किरण दाखवणारा आणि समाजाचा खरा आरोग्यरक्षक असतो. या भूमिकेला आपल्या कार्यातून न्याय देणारे प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अर्जुन शेळके यांना ‘लोकमत नांदेड गौरव सोहळा २०२६’ मध्ये सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार केवळ त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा नसून, दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी जपलेल्या माणुसकीच्या सेवेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि रुग्णांप्रती असलेल्या निस्वार्थ समर्पणाचा गौरव आहे. २००३ पासून ‘अपेक्षा हॉस्पिटल’ च्या माध्यमातून डॉ. शेळके यांनी नांदेड जिल्ह्यासह परिसरातील हजारो रुग्णांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी त्यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला. उपचारा सोबतच रुग्णाशी मायेने संवाद साधणे, त्याच्या मनातील भीती दूर करणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे ही त्यांची कार्यपद्धती आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत हजारो यशस्वी उपचार, कोरोना सारख्या भीषण संकटाच्या काळात दाखवलेली निस्वार्थ सेवा, तसेच ECHS अंतर्गत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलेली आरोग्यसेवा यामुळे डॉ. शेळके यांनी वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्याच बरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, आरोग्य जनजागृती उपक्रम आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणारे विविध कार्यक्रम राबवून त्यांनी डॉक्टर हा समाजाचा केवळ उपचारकर्ता नसून परिवर्तनाचा वाहक ही असू शकतो, हे सिद्ध करून दाखवले आहे. आज वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने बदलत असताना रुग्णांशी संवाद, सहानुभूती आणि सामाजिक उत्तरदायित्व ही मूल्ये जपणारे डॉक्टर समाजाला अधिक आवश्यक आहेत. डॉ. अर्जुन शेळके यांनी आपल्या कार्यातून याच मूल्यांचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्या मुळे वैद्यकीय व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याची भावना अधिक दृढ झाली आहे.’लोकमत’ सारख्या प्रतिष्ठित माध्यम समूहाने दिलेला हा सन्मान म्हणजे केवळ एका डॉक्टराचा गौरव नाही, तर रुग्ण केंद्रित आरोग्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकी जपणाऱ्या वैद्यकीय संस्कृतीचा सन्मान आहे. हा पुरस्कार डॉ. अर्जुन शेळके यांच्या कार्याचा मुकुटमणी ठरत असतानाच, वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक डॉक्टरने आपल्या ज्ञाना बरोबरच करुणा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेले कर्तव्यही तितक्याच प्रामाणिक पणे जपावे, असा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे. डॉ. अर्जुन शेळके यांची आजवरची वाटचाल हे सिद्ध करते की, रुग्णांचा विश्वास हीच डॉक्टराची सर्वात मोठी कमाई असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top