चौकट
नागरिकांची सुरक्षा की केवळ पोलिसांची प्रसिद्धी?
घरफोड्यांचा धोका आधीच माहीत असतानाही नागरिकांची घरे सुरक्षित राहिली नाहीत, ही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. गुन्हे घडल्यानंतर आरोपी पकडणे नव्हे, तर गुन्हे घडूच न देणे ही पोलिसांची खरी जबाबदारी आहे. नांदेडकरांना प्रसिद्धीपत्रकातील यशोगाथा नको, तर घरदाराच्या सुरक्षेची ठोस हमी हवी!

नांदेड दि. १७ नोव्हेंबर, (विशेष प्रतिनिधी): ——- दिवाळीच्या सणात नागरिक आनंदात असताना आणि आपल्या मूळ गावी किंवा बाहेरगावी गेलेले असताना, नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्यांचे सत्र पाहायला मिळाले. सह्याद्रीनगर, कार्तिक नगर आणि वर्धमान नगर यांसारख्या पॉश समजल्या जाणाऱ्या परिसरांमध्ये बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबवला. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नागरिक बाहेरगावी जाणार आणि अशा घटना घडण्याची शक्यता खुद्द पोलीस प्रशासनाला आधीच ठाऊक होती. प्रशासनाने याबाबत अलर्ट जारी करून पूर्वकल्पनाही दिली होती. असे असतानाही पोलिसांचा निष्काळजीपणा आणि अपुऱ्या बंदोबस्तामुळेच या घरफोड्या घडल्याची संतप्त भावना सर्व सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांचा पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न आणि वास्तव पोलीस अधीक्षक कार्यालय, यांच्यातर्फे दिवाळीपूर्व एक प्रेस नोट जारी करण्यात आली होती. यामध्ये भाग्यनगर पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्या कडून ८ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे आणि ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून या कारवाईचा मोठा उदोउदो केला जात आहे. मात्र, नागरिक आणि सुजाण अभ्यासकांमधून यावर तीव्र प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जेव्हा चोऱ्या होणार हे पोलिसांना आधीच माहीत होते, मग वेळीच प्रतिबंधक उपाय का योजले गेले नाहीत? पोलीस प्रशासनाच्या याच ढिसाळ कारभारामुळे सणाच्या दिवसांत सामान्यांचे संसार उघड्यावर पडले. जरी पोलिसांनी काही गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा केला असला, तरी या दिवाळीच्या काळात शहरात झालेल्या इतर घरफोड्यांचे काय? अनेक गुन्ह्यांतील चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत आणि चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल अद्याप रिकव्हर झालेला नाही. पोलीस केवळ मोजके गुन्हे उघडकीस आणून आपली पाठ थोपटून घेत आहेत, तर दुसरीकडे गुन्हेगार अजूनही मोकाट असल्याचे चित्र आहे. दिवाळीत जनतेच्या जीवाची आणि मालमत्तेची सुरक्षेची जबाबदारी असणारी यंत्रणा नेमकी काय करत होती? असा संतप्त सवाल आता नांदेडकरांकडून विचारला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून उर्वरित चोरांना लवकरात लवकर गजाआड करण्याची मागणी जोर धरत आहे.