घटनास्थळा पासून अल्प अंतरावर नवीन तयार होणारे न्यायालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच पोलीस महानिरीक्षक कार्यालय यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय संस्था आहेत. तरीही अशा गंभीर स्वरूपाची घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गस्त व्यवस्थेच्या प्रभावीपणाबाबत नागरिक दबक्या आवाजात प्रश्न उपस्थित करत आहेत.

नांदेड दि.०३ (उपसंपादक :सतीश वागरे) :—————- —- नांदेड जिल्ह्यातील असर्जन येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात मंगळवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी कथितरित्या चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या गळ्यावर व पोटावर चाकूचे वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी क्रिकेट खेळण्याच्या कारणा वरून काही विद्यार्थ्यां मध्ये वाद झाला होता. जखमी विद्यार्थी हा वाद सोडवण्यासाठी तेथे गेला होता. त्याचाच राग मनात धरून मंगळवारी शाळेची मधली सुट्टी झाल्या नंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी त्याच्याशी वाद घालत मारहाण केली. त्यानंतर त्याला शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शिव-गणेश मंदिराजवळ नेऊन चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात विद्यार्थ्याच्या गळ्यावर व पोटावर वार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही संशयित अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरण्यात आल्याचा संशय असलेला चाकू जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. अल्पवयीन मुलांमध्ये कायद्याचा धाक राहिला नाही का? तसेच अशा घटना रोखण्यासाठी पोलीस अधिक सतर्क राहण्याची गरज आहे का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसराजवळ तयार होत असलेले न्यायालय आहे, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच पोलीस महानिरीक्षक कार्यालय आहे. एवढ्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांच्या अगदी जवळ असलेल्या शाळेच्या आवारातच अशी घटना घडल्याने पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते साठी शाळांमध्ये अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांकडे घातक शस्त्रे कशी पोहोचतात याची चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.