
नांदेड दि ४ नोव्हेंबर, (विशेष प्रतिनिधी): ——— दिवाळी सणानिमित्त नागरिक आपल्या मूळ गावी किंवा बाहेरगावी जाणार असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नांदेड जिल्हा पोलीस दलाने एक अजब प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. तुमच्या घराची, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची काळजी तुम्हीच घ्या, आमची नाही, अशाच सुरात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून नागरिकांना थेट कानपिचक्या देणारे आवाहन करण्यात आले आहे. गुन्हेगारी रोखणे आणि कायदा-सुव्यवस्था राखणे ही मूळची खाकी वर्दीची जबाबदारी असताना, पोलीस प्रशासन आता ती सरळ सरळ नागरिकांच्याच माथी मारत असल्याचा तीव्र संभ्रम व संताप नांदेड मधील सर्वसामान्य नागरिकां मधून व्यक्त होत आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या वतीने जनसंपर्क विभागामार्फत ही प्रेस नोट काढण्यात आली असून, यामध्ये दिवाळीत घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष गस्त वाढवल्याचा नेहमीचा दावा करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात उपायांच्या नावाखाली नागरिकांना घरची रोकड बँकेत ठेवा, दरवाजाला कुलूप आहे हे बाहेरून दिसू देऊ नका, बाहेरगावी जाताना स्वतःच्या घराची काळजी घेण्यासाठी थेट शेजाऱ्यांवर व वॉचमनवर मदार ठेवा आणि प्रवासाचे फोटो किंवा माहिती सोशल मीडियावर अजिबात टाकू नका असे सांगत पोलीस प्रशासनाने अप्रत्यक्षपणे आपली जबाबदारी पूर्णपणे झटकल्याचे स्पष्ट होते. शहरातील बीट जमादार, बीट मार्शल आणि स्थानिक पोलीस यंत्रणा यांनी आपल्या भागात सातत्याने गस्त घालून कायदा व सुव्यवस्था राखणे अपेक्षित असते. मात्र, सण-सुदीच्या काळात जेव्हा चोरटे सक्रिय होतात, तेव्हा नागरिकांनाच स्वतःच्या घराचे रक्षण करण्याचे आवाहन करून पोलीस प्रशासनाने आपली जबाबदारी लांब ढकलल्याची चर्चा रंगली आहे. जर घराची आणि सामानाची काळजी नागरिकांनीच घ्यायची असेल, तर मग पोलीस प्रशासन आणि कायदा-सुव्यवस्था यंत्रणेचे काम नेमके काय, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात असून प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सणाच्या तोंडावर नांदेडकरांमध्ये सुरक्षेबाबत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.