
नांदेड दि. ८ नोव्हेंबर, ———-————————– शहरात खाकी वर्दीच्या कार्यक्षमतेवर आणि कायदा-सुव्यवस्थेच्या रक्षकांवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सलग समोर येत आहेत. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्नीच्या खुनातील आरोपीने पोलीस कोठडीतील ठाण्याच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्ददायक घटना घडली असतानाच, अवघ्या आठ दिवसांच्या आत आज सोमवारी भाग्यनगर पोलीस ठाण्यातही असाच प्रकार घडला. दोन अल्पवयीन मुलींना पळवून आणल्यानंतर चौकशी आणि अटकेच्या दबावाखाली असलेल्या एका तरुणाने थेट भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून खाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या सलग दोन गंभीर घटनांमुळे पोलिसांच्या ताब्यातील आरोपींच्या सुरक्षिततेचा आणि यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा बोजवारा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या सोमवारी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घडलेल्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अद्याप सीआयडी मार्फत सुरू आहे, आणि त्या प्रकरणी संबंधित जबाबदार पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा बद्दल जिल्हा पोलीस प्रमुखां कडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या नरमाईच्या भूमिके मुळे आणि दिरंगाई मुळेच पोलीस ठाण्यांच्या सुरक्षिततेचे धिंडवडे निघत असल्याची चर्चा सर्व सामान्यांतून तीव्रतेने होत आहे. एका पाठोपाठ एक घडलेल्या या दोन धक्कादायक घटनांनी नांदेड पोलीस प्रशासनाच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या एकूणच कार्यक्षमतेवर मोठा आक्षेप घेतला गेला आहे. सध्याच्या ताज्या घटनेनुसार, बिलोली आणि माजलगाव येथील दोन अल्पवयीन मुली ४ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्या होत्या. पालकांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे त्या मुली परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील झुट्टा येथील कार्तिक विलास झुटे आणि ओमकार रामेश्वर शहाणे या दोन तरुणांच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सोलापूर रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत त्या दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन नांदेड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांचे पथक सोलापूरला रवाना झाले आणि दोन मुलींसह दोन्ही तरुणांना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कागदपत्रे आणि अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू असतानाच, कारवाईच्या व पोलीस दाबाच्या प्रचंड भीतीपोटी ओमकार रामेश्वर शहाणे (२१) या तरुणाने थेट ठाण्याच्या इमारती वरून खाली उडी मारली. या भीषण प्रकारात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे समजते. एकीकडे पोलीस ठाण्यांच्या आवारात आरोपींचे असे टोकाचे पाऊल उचलणे आणि दुसरीकडे ग्रामीण ठाण्यातील घटनेवर अद्याप कोणतीही प्रशासकीय कारवाई न होणे, यामुळे खाकी वर्दीच्या धाकावर आणि सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे केवळ पोलिसांच्या कार्य पद्धतीवरच नाही, तर ज्या खाजगी हॉस्टेल मधून या मुली बेपत्ता झाल्या, त्या हॉस्टेल चालकाच्या कारभारावरही सुरक्षेच्या संदर्भात प्रचंड हलगर्जीपणा दिसून आला आहे. पोलीस यंत्रणा गुन्हेगार पकडून आणल्यानंतर त्यांच्यावर असणारा मानसिक ताण हाताळण्यात अपयशी ठरत आहे का? पोलीस ठाण्यांसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सरकारी वास्तूमध्ये आरोपी सहजपणे जीव टोकाला कसा लावतात, याविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या नवीन गंभीर घटने नंतर जिल्हा पोलीस प्रशासन नेमकी काय कठोर भूमिका घेते आणि दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चौकट – नांदेडमध्ये पोलीस कोठडीत सलग दोन आत्महत्या प्रकरणांमुळे पोलिसांवरील विश्वास ढासळला आहे. कायद्याचे रक्षक समजल्या जाणाऱ्या ठाण्यात आरोपींच्या सुरक्षेची हमी न मिळाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांबद्दलची भीती आता आदरात न राहता संशयात परावर्तित होत असून, यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.