
दि. १९ नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी) ————————————- शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये घरगुती कचऱ्याच्या डोंगरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मोठी वाहने या चिंचोळ्या मार्गांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने कचरा गोळा होत नसून, ठिकठिकाणी दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांनी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

डॉ. यादव म्हणाले, “शहरातील काही भागात मोठ्या कचरा वाहनांना प्रवेश करणे अशक्य होऊन बसले आहे. यामुळे त्या परिसरातील कचरा दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १६ मध्ये पूर्वी लहान हातरिक्षा व पॅडल रिक्षांनी कचरा गोळा केला जात होता, मात्र गेल्या काही वर्षांपासून ही व्यवस्था बंद पडल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. आता या भागातील गल्लोगल्ली कचऱ्याने भरल्या आहेत.” साचलेल्या कचऱ्यामुळे डास, माश्या व उंदरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड, गॅस्ट्रो व कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, गरोदर माता आणि वृद्धांना सोसावा लागत असल्याची खंत डॉ. यादव यांनी व्यक्त केली. काही ठिकाणी घरांवर ‘क्यूआर’ कोड लावून कागदोपत्री कारवाई करण्यात येत असून, प्रत्यक्षात कचरा उचलण्यात येत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या दिशाभूल करणाऱ्या कारभारामुळे करदाते नागरिक संतापले आहेत. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार प्रत्येक घरापर्यंत कचरा संकलन करणे पालिकेवर बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत डॉ. यादव यांनी मनपाला तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. चिंचोळ्या गल्ल्यांसाठी स्वतंत्र कचरा संकलन यंत्रणा तातडीने सुरू करावी, साचलेला कचरा लगेच उचलून जंतुनाशक फवारणी करावी, आणि विशेष स्वच्छता अभियान राबविण्यासाठी जबाबदार अधिकार्यांची नेमणूक करावी. या गंभीर समस्येची दखल घेऊन प्रशासनाने नागरिकांना दिलासा देणारी कारवाई कधी केली जाणार, याकडे संपूर्ण नांदेड शहराचे लक्ष लागले आहे.