
नांदेड | दि. १८ (जिल्हा प्रतिनिधी) —- यादव-अहीर-गवळी समाजातील होतकरू युवक आकाश छोटूलाल यादव (वजीराबाद, नांदेड) यांनी देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी सनदी लेखापाल परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन समाजाचा गौरव वाढविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुरुवारी, दि. १८ जून रोजी वजीराबाद येथील यदुकुल बलराम यादव नगर येथे भव्य स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आकाश यादव यांचा फेटा बांधून, शाल परिधान करून, हार व पुष्पगुच्छ अर्पण करून सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या यशा मागे मोलाचे योगदान असलेल्या त्यांचे वडील छोटूलाल यादव यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आकाश यादव यांच्या जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेड्या वृत्तीचे कौतुक केले. त्यांच्या या यशामुळे समाजातील युवकांना नवी दिशा व प्रेरणा मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. भविष्यातील वाटचाली साठी आकाश यादव यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार सोहळ्यास अखिल भारतीय यादव महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस बिशनकुमार यादव, प्रा. डॉ. कैलास यादव, भारतभूषण यादव, गगन यादव, गोपाल यादव, भारत पहलवान, कालू बटाववाले, बाळू कुलकर्णी, स्वराज यादव, अजय यादव, सचिन पाटील यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकाश यादव यांच्या या यशामुळे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण यादव-अहीर-गवळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशाने समाजातील विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.