नोकरीचे आमिष, अश्लील फोटो पाठवून पाच वर्षे अत्याचार; ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यावर पोर्नव्हिडिओ प्रकरणात गुन्हा दाखल

नेमका जागतिक महिला दिनाच्या दिवशी स्त्रियांच्या सन्माना ची भाषणे होत असताना, प्रत्यक्षात मात्र अशा घटना घडतात ही विडंबनाच नाही का?” नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी अशी वागणूक देणारा नेता समाजात कसा वावरू शकतो?

पुलगाव/वर्धा, दि. ८ मार्च: (विशेष प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातून समाजाला सुन्न करणारी एक अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) एका ज्येष्ठ नेत्याने अवघ्या १७ वर्षांच्या मुलीचे नोकरीचे आमिष दाखवून गेली पाच वर्षे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून वारंवार प्रताडित केल्याचा आरोप असून या प्रकरणाने जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिवाकर गमे याने पीडित मुलगी अल्पवयीन असतानाच तिच्याशी मैत्री केली. तिच्या कुटुंबीयांशी जवळचे संबंध असल्याचा गैरफायदा घेत त्याने तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. याचा वापर करून आरोपीने सुमारे पाच वर्षांच्या कालावधीत पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. नुकतेच त्याने पीडितेला काही अश्लील फोटो व व्हिडिओ पाठवून तिला मानसिक रित्या हैराण केले. या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पुलगाव पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शुक्रवारी (७ मार्च) सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला असून त्यातील आशयातून आणखी गंभीर पुरावे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यां च्या देखरेखी खाली सुरू आहे.आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित असून तो पक्षाच्या एका दिग्गज नेत्याचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आले आहे. या घटनेकडे केवळ एका व्यक्तीचा गुन्हा म्हणून न पाहता, राजकीय संरक्षणाच्या कक्षेत अशा घटना घडत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अद्याप आरोपीच्या पक्षाकडून याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.जागतिक महिला दिनाच्या उंबरठ्यावर ही घटना घडल्याने स्त्री-सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पीडित मुलगी तब्बल पाच वर्षे या छळाला का सामोरी गेली, तिच्या कुटुंबीयांना किंवा समाजाला याचा अंदाज का आला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे, एक आरोपी पाच वर्षे सूत्रे हाताळत कसा राहिला, या गंभीर प्रश्नाचे उत्तरही तपासातून मिळणे अपेक्षित आहे.

घटनेनंतर समाजातील जाणकार मुलींच्या वाढत्या वयात पालकांनी अत्यंत दक्ष राहण्याचे आवाहन करत आहेत. मुलींच्या मोबाईलचा वापर, त्यांच्या मित्रपरिवारा बाबत पालकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास लगेच पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top