
नांदेड दि. ७ एप्रिल (ग्रामीण प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी ‘नि:शुल्क आरोग्य तपासणी’ (Full Body Checkup) शिबिर आयोजित करण्याची मागणी अधिसभा सदस्य शिवाजी धोंडीबा चांदणे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विद्यापीठाचे कुलसचिव यांना लेखी निवेदन दिले आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात कौटुंबिक जबाबदाऱ्या, वाढती महागाई, प्रदूषण आणि अनियमित जीवनशैली यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत.

अनेकदा वेळेअभावी आजारांचे निदान होत नाही. जर कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ असेल, तरच कार्यालयीन कामकाजाला गती मिळते, हा दृष्टिकोन समोर ठेवून या शिबिराची मागणी करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त सामाजिकशास्त्र व शिक्षणशास्त्र संकुलाच्या पुढाकाराने ‘महालॅब’च्या माध्यमातून अशा प्रकारचे शिबिर राबवण्यात आले होते. त्यावेळी CBC, Cholesterol, Lipid Profile, Vitamin B-12, D, Thyroid यांसारख्या उच्च दर्जाच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे अनेकांच्या व्याधींचे वेळेत निदान झाले होते. तोच आदर्श समोर ठेवून यंदाही एप्रिल महिन्यात हे शिबिर राबवावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.शिबिराचा लाभ घेण्यासाठी आगाऊ नियोजन म्हणून गूगल फॉर्म (Google Form) द्वारे नोंदणी करून परिपत्रक काढण्यात यावे, जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना उपाशीपोटी रक्ताचे नमुने देऊन या सुविधेचा लाभ घेता येईल, असेही अधिसभा सदस्ययांनी सुचवले आहे.विद्यापीठ प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच शिबिराची तारीख जाहीर करावी, अशी अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त होत आहे.
