३० ऑगस्टला नांदेडमध्ये पुरस्कार वितरण; बुद्ध-भीम गीतांच्या संगीत मैफलीचेही आयोजन

दि. २२ नांदेड : ( विशेष जिल्हा प्रतिनिधी) – – – – – – आंबेडकरी विचार, सामाजिक चळवळ आणि परिवर्तनवादी प्रबोधनाला डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ अभ्यासक तथा पत्रकार डॉ. प्रा. कैलाश भानुदास यादव यांची २०२६ च्या ‘तुफानातील दिवे’ पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डिजिटल पत्रकारिता आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सोशल मीडिया, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच वेब पोर्टलच्या माध्यमातून डॉ. यादव यांनी आंबेडकरी विचार, सामाजिक प्रश्न, चळवळीतील विविध उपक्रम आणि आंदोलनांचा आवाज व्यापक समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या ‘खबर आप तक’ आणि ‘एचआरडी न्यूज’ या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीतील घडामोडींना प्रभावीपणे मांडण्याचे काम सातत्याने करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमांचा केवळ माहिती प्रसारासाठी नाही , तर सामाजिक परिवर्तन आणि वैचारिक प्रबोधनासाठी प्रभावी वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये डॉ. यादव यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. युगकवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे यांच्या जयंतीनिमित्त ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, नांदेड येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गौतम कदम यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून शंकरदादा चंद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून मनपा नांदेडचे गटनेते व नगरसेवक इंजि. प्रशांत इंगोले उपस्थित राहणार आहेत.
हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून आंबेडकरी विचार, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी प्रबोधनाच्या कार्याला मिळालेली प्रेरणा आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून महापुरुषांचे विचार, सामाजिक प्रश्न आणि चळवळीचा आवाज समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा माझा प्रयत्न यापुढेही सुरू राहील. – डॉ. कैलास यादव
या सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत गायकांच्या सहभागातून ‘बुद्ध-भीम गीतांची संगीत मैफल’ आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुरस्कार सोहळ्या सोबतच वैचारिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमाची मेजवानी उपस्थितांना अनुभवता येणार आहे.पुरस्काराची घोषणा होताच अखिल भारतीय यादव महासभेचे बिशनकुमार यादव, गोकुल यादव, राधाकिशन लक्ष्मणजी यादव, दुर्गाप्रसाद गणेशलाल यादव, जयवर्धन भोसीकर, भारतभूषण यादव, गगन लालमन यादव, संजय फुलारी, गोपाल फतेहलश्करी, सतीश यादव, राजेश कुलकर्णी, रोशन यादव आदींसह सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. यादव यांचे अभिनंदन केले. पुरस्कार सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, साहित्यिक, कलाकार तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संजय निवडगे यांनी केले आहे.