​राजरत्न पवार यांची महासचिवपदी निवड; आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा अधिक बळकट होणार

दि. २० नांदेड (विशेष प्रतिनिधी): ——————— महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने राजरत्न निवृत्ती पवार यांची आदिवासी विकास विभागातील अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे राज्यभरातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नांना संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावी नेतृत्व मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. राजरत्न पवार यांना तब्बल २५ वर्षांचा प्रदीर्घ सामाजिक व संघटनात्मक कार्याचा अनुभव आहे. त्यांनी आपल्या चळवळीची सुरुवात विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून केली. गेल्या १५ वर्षांपासून ते आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक हक्कांसाठी, न्यायासाठी आणि प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन व प्रशासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने संघर्ष करत आहेत. आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे रखडलेले प्रश्न, सेवाविषयक अडचणी, हक्क व विविध मागण्यांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. संघटनात्मक पाठपुरावा आणि प्रशासनाशी प्रभावी समन्वय साधत अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. “आदिवासी विकास विभागातील अनुदानित आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडवणे, कर्मचाऱ्यांचे हितसंरक्षण करणे, संघटनेचा राज्यभर विस्तार करणे आणि शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे, ही माझी प्रमुख प्राधान्ये असतील,” अशी भूमिका नवनिर्वाचित राज्य महासचिव राजरत्न पवार यांनी व्यक्त केली. त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे तसेच अतिरिक्त महासचिव सुशिल तायडे यांचे आभार मानले. राजरत्न पवार यांच्या नियुक्तीचे राज्यभरातील आश्रमशाळा कर्मचारी, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले असून, त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या हक्क व न्यायाच्या लढ्याला नवी दिशा आणि संघटनात्मक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top