बार्टी संशोधकांच्या आंदोलनाला यश; २०२३च्या पीएच.डी. विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्तीची लेखी हमी

दहाव्या दिवशी आमरण उपोषणाची सांगता २०२४ आणि २०२५च्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा कृती समितीचा निर्धार

दि. ३ पुणे (प्रतिनिधी)———— डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे समोर सुरू असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर ठोस यश मिळाले आहे. २०२३ मध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना वयाची मर्यादा न ठेवता सरसकट अधिछात्रवृत्ती देण्याबाबत राज्य शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाची गुरुवारी सांगता करण्यात आली. सुरेखा वासनिक आणि किरण देवकरे यांनी दहाव्या दिवशी आपले आमरण उपोषण सोडले. बार्टीने ऑगस्ट २०२६ मध्ये २०२३, २०२४ आणि २०२५ या सत्रांमध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध केली होती.

मात्र, ही जाहिरात ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या सर्वंकष धोरणाच्या आधारे काढण्यात आल्याने अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केला होता. या धोरणा विरोधात समितीच्या वतीने १९ ऑगस्ट पासून समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. त्यानंतर २४ ऑगस्टपासून सुरेखा वासनिक आणि किरण देवकरे यांनी आमरण उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी शासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.’ कृती समितीने ३० ऑक्टोबर २०२३चे सर्वंकष धोरण बार्टीवर लागू करू नये, २०२३, २०२४ आणि २०२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती द्यावी, तसेच अधिछात्रवृत्ती देताना वय आणि उत्पन्नाच्या आधारे कोणतीही मर्यादा घालू नये, अशा प्रमुख मागण्या केल्या होत्या. गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी राज्य शासनाकडून २०२३ मध्ये पीएच.डी.साठी प्रवेश घेतलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना वयाची मर्यादा न ठेवता अधिछात्रवृत्ती देण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. यासंदर्भात ठोस निकष निश्चित करून निर्णय घेण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर दोन्ही आंदोलकांनी आमरण उपोषण मागे घेतले. उपोषण सोडण्याचे पत्र बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले. २०२३च्या विद्यार्थ्यांच्या मागणीला मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाच्या एका टप्प्याची सांगता झाली असली, तरी २०२४ आणि २०२५मध्ये पीएच.डी. प्रवेश घेतलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना देखील सरसकट अधिछात्रवृत्ती मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला आहे.

तसेच ३० ऑक्टोबर २०२३चे सर्वंकष धोरण रद्द करण्यात यावे, या मागणीवरही समिती ठाम असून, ही मागणी मान्य होईपर्यंत संशोधक विद्यार्थी शांत बसणार नाहीत, असा इशारा कृती समितीने दिला. आंदोलनस्थळी बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे, प्रवीण खंदारे, योगेश माहुरे, अनिता काळे, प्रकाश दिपके, जयवर्धन गच्चे, सुवर्णा हातोले, विकी टाकळीकर यांच्यासह असंख्य संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राहुल डंबाळे आणि मानसी वानखेडे यांनीही आंदोलनाला समर्थन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top