‘तुफानातील दिवे’ पुरस्काराने सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा गौरव

दि. २९ नांदेड, (जिल्हा प्रतिनिधी) : ——— युगकवी, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या २१ व्या जयंतीनिमित्त नांदेड मध्ये रविवार, ३० ऑगस्ट रोजी भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडियम येथे दुपारी २ वाजता होणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत गायकांचा संगीत जलसा रंगणार असून, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘तुफानातील दिवे’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महाकवी वामनदादा कर्डक तसेच कवी-गायक प्रतापसिंग बोदडे यांच्या जयंतीनिमित्त हा संयुक्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गेल्या २१ वर्षांपासून हा उत्सव सातत्याने साजरा केला जात असून, यंदाचा सोहळा विशेष भव्य स्वरूपात होणार असल्याची माहिती मुख्य संयोजक संजय निवडंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य इंजि. प्रशांत इंगोले यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरदादा चंद्रे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. गौतम कदम हे स्वागताध्यक्ष असून, निमंत्रक प्रल्हाद इंगोले यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘तुफानातील दिवे’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात डॉ. एस. आर. लोणीकर, प्रा. डॉ. जे. टी. जाधव, भीमराव पवार, कॉम्रेड मुकुंदा कदम, चंदर मिसाळे आणि प्रणिता कांबळे यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर पत्रकारिता क्षेत्रात दौंड येथील जयदीप बगाडे, अरुण कांबळे लोहगावकर, मारुती शिकारे, प्रा. डॉ. कैलास यादव, सुभाष लोणे, केशव वाघमारे आणि माधव हनुमंते यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक आणि कवी प्रतापसिंग बोदडे यांच्या अजरामर गीतांचा संगीत कार्यक्रम. नांदेडचे संगीतकार शुद्धोधन कदम यांच्या संगीत संयोजनात होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत गायक नागसेन दादा सावदेकर, चंद्रकांत शिंदे, कुणाल वराळे, अजय देहाडे आदी कलावंत आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नांदेड शहरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीने तयारी पूर्ण केली असून, परिसरातील रसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नांदेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाकवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांना अभिवादन करावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.